झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा सोमवारी काढून घेण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती. हा निर्णय का मागे घेण्यात आला याची माहिती देण्यात आली नसली तरी आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पुन्हा दिल्ली पोलिसांना सोपवण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री रेखा यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी रविवारी दुसरी अटक करण्यात आली. मुख्य आरोपी राजेशभाई खिमजीभाई सकरिया यांचा सहकारी तहसीन सय्यद याला अटक करण्यात आली आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तक्रारदार म्हणून आलेल्या राजेश यांनी कागदपत्रे देताना मुख्यमंत्र्यांचा हात खेचला. हल्ल्यात रेखा यांच्या हाताला, खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.









