भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब : आज दुपारी साडेबारा वाजता शपथविधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. रविशंकर प्रसाद, ओ. पी. धनखड या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. प्रवेश वर्मा आणि विजेंद्र गुप्ता यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर एकमत घडवण्यात आले. गुप्ता यांच्या माध्यमातून दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभणार आहे. तसेच सध्याच्या भाजपशासित राज्यांमधील त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी बुधवारी रात्री 8 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:35 वाजता रामलीला मैदानावर होईल. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमत्र्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर रेखा गुप्ता यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी शपथविधीसाठी तयार राहण्याची सूचना केली.
शपथविधीची तयारी पूर्ण
दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या शपथविधीचाही उल्लेख आहे. या कार्यक्रमाला 30 हजार पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. याशिवाय उद्योगपती, चित्रपट तारे, क्रीडापटू, संत-महंत आणि राजनयिक अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त दिल्ली विधानसभा क्षेत्रातून 12 ते 16 हजार समर्थक-कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
रेखा गुप्ता कोण?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या शालीमार बाग मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हरियाणातील जिंद जिह्यातील जुलाना शहरातील आहे. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) काम करत होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात प्रवेश केला होता. त्या महाविद्यालयीन काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जोडलेल्या आहेत. रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) पासून सुरू झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या सचिव म्हणूनही काम केले. त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे आणि संघटनात्मक क्षमतेमुळे त्या भाजपमध्ये एक मजबूत नेत्या म्हणून उदयास आल्या आहेत.
आरएसएसची शिफारस अन् भाजपचा निर्णय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएसने भाजपला महिला मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला दिला होता. पक्षाने हा प्रस्ताव स्वीकारला असून रेखा गुप्ता यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या भाजपच्या रणनीतीचा एक भाग म्हणूनही हा निर्णय विचारात घेण्यात आला. सध्या कोणत्याही भाजपशासित राज्यात महिला मुख्यमंत्री नाहीत, अशा परिस्थितीत दिल्लीपासून सुरुवात करण्यासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाला बहुतांश जणांनी पसंती दर्शवली.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बरीच नावे
भाजपने नेहमीच आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने आश्चर्यचकित केले आहे. पक्षाने सर्व राजकीय अटकळ बाजूला ठेवून संघटनेतील जुन्या चेहऱ्यांना राज्याची सूत्रे सोपवली आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 आमदारांची नावे आघाडीवर होती. सुरुवातीला पक्षाने 15 आमदारांची नावे निश्चित केली. त्यापैकी 9 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. या 9 नावांमधून मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित करण्यात आली. दिल्ली मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 7 मंत्री असणार आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधून प्रत्येकी एका भाजप आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे दहा नावांवर चर्चा झाली. परंतु शेवटी प्रवेश वर्मा आणि रेखा गुप्ता यांच्यापैकी महिलेला संधी देण्यावर एकमत झाले. वैश्य समुदायाच्या रेखा गुप्ता या भाजपच्या मुख्य मतपेढीचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांचा दावा अधिक मजबूत होता.









