इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचे प्रयत्न असफल : इस्रायलने लेबनॉनविरोधातही थोपटले दंड
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दहाव्या दिवशीही सुरू राहिला. इस्रायलच्या राजधानीवरच पुन्हा रॉकेट हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली. याचदरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘मुळीच युद्धविराम करणार नाही.’ असे ट्विट करत हमासविरोधातील लढाई तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच इराण-समर्थित हिजबुल्लाह विरोधातही दंड थोपटत हमासला पाठिंबा दिल्यास लेबनॉनलाही ‘उद्ध्वस्त’ केले जाईल, अशी धमकी इस्रायलने दिली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने संपूर्ण जग हादरले आहे. दोन्ही बाजूंमधील युद्ध सातत्याने धोकादायक वळण घेत आहे. या युद्धाला विध्वंसक रूप धारण करण्यापासून रोखण्यासाठी जगातील अनेक मोठे देश आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. एकीकडे अमेरिका इस्लामिक देशांशी संपर्कात आहे. दुसरीकडे रशिया आणि चीनही मध्यममार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेले दिसत नाही.
7 ऑक्टोबर रोजी अतिरेकी गट हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर 5000 रॉकेट डागत इस्रायलमध्ये प्रवेश केल्यानंतर इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्यास सुऊवात केली. यानंतर इस्रायलने तात्काळ युद्ध घोषित केल्यानंतर इस्रायली सुरक्षा दलांनी पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरू केल्याने संघर्षाचा भडका उडाला आहे. सोमवारीही दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले झाल्याचे समजते. इस्रायलच्या राजधानीच्या शहरावर पुन्हा रॉकेटहल्ला झाल्याने नेत्यानाहू यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर किमान 4 अँटी-टँक गायडेड क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. यावर इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ला करून रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
जो बायडेन करणार इस्रायल दौरा?
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलला भेट देण्याच्या विचारात आहेत. हमासविऊद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना इस्रायल भेटीचे निमंत्रण दिले आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलचा दौरात करत वाटाघाटींमध्ये सक्रीयपणे सहभाग नोंदवला आहे. इस्रायलसोबतच पॅलेस्टिनी नेत्यांच्या संपर्कात राहून अमेरिकन मंत्री चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. आता जो बायडेन यांच्या इस्रायल दौऱ्याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.
इस्रायलची सज्जता सुरूच
युद्धादरम्यान इस्रायलने गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. जमिनीवरील कारवाईसाठी सैन्यदल ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. संघर्ष वाढल्यास इस्रायलचे सैन्य हमास दहशतवाद्यांविरोधात ग्राउंड ऑपरेशन पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात.
लेबनॉन सीमेवरही दक्षता
इस्रायलने लेबनॉनच्या सीमेवरून नागरिकांना बाहेर काढण्यास सुऊवात केली आहे. ते देशाच्या उत्तरेकडील लेबनीज सीमेच्या आत दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात राहणाऱ्या 28 समुदायांना बाहेर काढत आहे. त्यांना सुरक्षित भागात सरकारी अतिथीगृहांमध्ये ठेवण्यास सुऊवात केली आहे. गेल्या काही दिवसात गाझा पट्टीव्यतिरिक्त लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले आहेत. इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेने हे हल्ले केले असून त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.









