सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सदर याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांता आणि एनके सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला कडक शब्दात फटकारले. देशाच्या दृष्टीने हा एक संवेदनशील काळ आहे. संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट दाखवत आहे. अशा वातावरणात तुम्हाला सुरक्षा दलांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अशी विचारणा करत अशा याचिका न्यायालयात आणू नका, अशी कडक टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांमध्ये फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांची नावेही समाविष्ट आहेत. केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, असेही याचिकेत म्हटले आहे. यासंबंधी गुरुवारी सुनावणी पार पडली. याप्रसंगी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा, असे न्यायमूर्ती सूर्यकांता म्हणाले. देशाप्रती तुमचेही काही कर्तव्य आहे. तुम्ही एका निवृत्त न्यायाधीशाला चौकशी करायला सांगत आहात. आपण दहशतवादी हल्ल्यांच्या तपासात कधीपासून तज्ञ झालात? असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला.









