वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आगामी होणाऱया कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या निवड समिती नवोदित रेहान अहमदला वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवडय़ात 18 वर्षीय रेहान अहमदने पाकविरुद्धच्या कराचीतील शेवटच्या कसोटीत पदार्पण केले होते. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये पदार्पण करणारा रेहान अहमद हा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. रेहानने 1949 साली नोंदविलेला ब्रायन क्लोजचा विक्रम मागे टाकताना पदार्पणातच पाकविरुद्धच्या सामन्यात पाच बळी मिळविले होते. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज रेहानने इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये लिसेस्टरशायर क्लबकडून केवळ 3 सामने खेळले आहेत.
इंग्लंडचा संघ फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात दोन कसोटी सामने खेळविले जाणार असून माऊंट माँगेनुई आणि वेलिंग्टन येथील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याने इंग्लंड निवड समितीने फिरकी गोलंदाज रेहानला वगळण्याची शक्यता वर्तविली आहे. इंग्लंड संघात जॅक लिचने आपले स्थान कायम राखले आहे. इंग्लंडने अलीकडेच पाकच्या भूमीत यजमान संघाचा कसोटी मालिकेत तब्बल 17 वर्षांनंतर व्हाईटवॉश केला.









