महानगरपालिका प्रशासकांकडून पाणीपुरवठा अधिकारी धारेवर
पाचगाव/वार्ताहर
पाचगाव ला नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली . त्यानुसार पाचगावला नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल असे प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. पाणी प्रश्न संदर्भात आयोजित बैठकीत प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरले.
पाचगाव येथील पाणी प्रश्न संदर्भात आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह गुरुवारी सकाळी महानगरपालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाचगाव ला नियमित पाणीपुरवठा करण्यास सांगितले. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचगाव परिसराची व्याप्ती मोठी असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण येत असल्याचे सांगितले.
पाचगाव ग्रामपंचायत सदस्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मोटर 1978 सालच्या असून त्या बदलण्यात याव्यात , सुभाष नगर पंपिंग पूर्ण क्षमतेने सुरू करावे ,योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. पाणी बिल आणि त्यासाठीची डिपॉझिट महानगरपालिका घेते मात्र पाचगाव परिसरात लिखित झाल्यास त्याचा खर्च पाचगाव ग्रामपंचायतला का? असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांनी यावेळी केला.
यावेळी पाचगाव चे उपसरपंच डॉ स्नेहल शिंदे माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर प्रवीण कुंभार, भाऊ दळवी, संदीप गाडगीळ, जल अभियंता प्रिया पाटील, जल अभियंता हर्षदीप घाटगे, वॉर्ड ऑफिसर एम एस पाटील यांच्यासह पाचगाव ग्रामस्थ उपस्थित होते.









