बेळगाव वनमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी : ग्रामीण भागाचा हिरमोड
बेळगाव : कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी शक्ती योजनेला गेल्या रविवारी चालना देण्यात आली होती. तर याच पाच गॅरंटीपैकी एक असणाऱ्या गृहज्योती योजनेला रविवार दि. 18 रोजी दुपारी 3 पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी बेळगावमधील नागरिकांनी नावनोंदणी करण्यासाठी बेळगाव वन कार्यालयांमध्ये तुफान गर्दी केली होती. निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यात सत्तेत आल्यावर पाच गॅरंटी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आता यातील एकेक योजना लागू केली जात आहे. घरगुती वीजजोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. घरमालकासह भाडेकरुंनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
रविवार दि. 18 पासून गृहज्योती योजनेच्या नावनोंदणीला प्रारंभ झाला. सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील बेळगाव वन कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होती. परंतु, राज्य सरकारकडूनच सेवासिंधूवर माहिती दिली जात नसल्याने नोंदणी होत नव्हती. अखेर दुपारी 3 नंतर नावनोंदणी करण्यास सुरुवात झाली. नावनोंदणीसाठी बेळगाव वन कार्यालयांमध्ये नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. आधारकार्ड, आर.आर.नंबर, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल घेऊन नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सेवासिंधू वेबसाईटवर बेळगाव वन कार्यालयात ग्राहकांची माहिती भरली जात होती. बऱ्याच वेळा आधारकार्डवरील नाव व वीजमीटरवरील नाव यामध्ये तफावत असल्यामुळे नावनोंदणी रद्द होत होती. त्यामुळे तासभर रांग लावून नोंदणी न करताच माघारी फिरावे लागले. ज्या व्यक्तीच्या नावावर विद्युतमीटर त्या व्यक्तीचेच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले. नावनोंदणी यशस्वी झालेल्या ग्राहकांकडून 20 रुपये शुल्क आकारून पोचपावती देण्यात येत होती.
मोबाईल किंवा लॅपटॉपवर नोंदणी
गृह ज्योती योजनेच्या नोंदणीसाठी नेट सेंटर किंवा वीज कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या काही मिनिटांत मोबाईल किंवा लॅपटॉपवर नोंदणी करता येते. 200 युनिट मोफत वीज मिळविण्यासाठी प्ttज्://sान्asग्ह्प्ल्gs.क्arहूक्a.gदन्.ग्ह या लिंकद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोण पात्र आहे?
या योजनेसाठी सर्व इलेक्ट्रिकल गृह खरेदीदार पात्र आहेत. व्यावसायिक इमारतींसाठी कोणतीही सुविधा नाही. नोंदणीबाबत कोणताही गोंधळ असल्यास हेल्पलाईन क्रमांक 1912 वर संपर्क साधू शकता. लाभार्थी भाडेकरू असल्यास, सेवा सिंधू पोर्टलवर त्यांच्या निवासी पत्त्याची पुष्टी करून त्यांचा आधार क्रमांक लिंक करून आणि नोंदणी करून ही सुविधा मिळवू शकतात.
नोंदणीनंतर पुढे काय?
नोंदणी केल्यानंतर वीजपुरवठा कंपनीचे कर्मचारी येऊन अर्ज तपासतील. मासिक मोफत वापराचे युनिट, मागील एका वर्षातील विजेची सरासरी रक्कम घेऊन निर्धारित केले जाते. त्यानंतर ही योजना अधिकृत होईल.
अर्ज प्रक्रियेत अडथळा
पहिल्याच मोठ्या संख्येने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे आल्याने सेवासिंधू पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. सर्व्हर सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तांत्रिक तज्ञांना पाचारण केले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून गृहज्योती योजना सादर केल्यानंतर काही क्षणातच पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाला.









