मोफत वीज योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्यांना खूशखबर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने गृहज्योती योजनेंतर्गत 1 जुलैपासून 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात असून रविवार, 18 जूनपासून नोंदणीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे मोफत वीज योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्यांना खूशखबर मिळाली आहे.
गृहज्योती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. या पोर्टलवर https://sevasindhugs.karnataka.gov.in/gruhajyothi नोंदणी करावी लागणार आहे. सदर पोर्टल मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपवर देखील हाताळता येणार आहे. लाभार्थींना आधार कार्ड, वीज बिलावर नमूद असलेल्या अकाऊंटची माहिती नोंदणीवेळी द्यावी लागणार आहे. बेंगळूर वन, ग्राम वन आणि कर्नाटक वन केंद्रांमध्ये किंवा कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रांवर देखील नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालय किंवा हेल्पलाईन क्रमांक 1912 वर संपर्क साधता येईल.
गृहज्योती योजना ही राज्य सरकारची पाच गॅरंटी योजनांपैकी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक घराला दरमहा कमाल 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ग्राहकाने वापरलेल्या प्रत्येक महिन्यातील वीज युनिटची सरासरी काढून त्यात अतिरिक्त 10 टक्के समाविष्ट करून इतकी मोफत वीज दिली जाणार आहे. सरासरी 200 युनिटपेक्षा अधिक वीज वापरलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
यापूर्वी राज्यातील महिलांना परिवहनच्या बसेसमधून मोफत प्रवास करण्यासाठी शक्ती योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेपाठोपाठ गृहज्योती योजना जारी केली जात आहे. या योजनेसाठी रविवार दि. 18 जूनपासून नोंदणीला सुरुवात होत आहे. या योजनेमुळे 2.14 कोटी वीज वापरकर्त्यांना अनकूल होणार आहे. जुलै महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ऑगस्ट महिन्यात येणार आहे. ग्राहकाला निश्चित करून दिलेल्या प्रमाणात मोफत वीज वापरता येईल.









