इतर संस्थांना नोंदणीसाठी मुदतवाढ ; असोसिएशनच्या बैठकीत विविध निर्णय
प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे यावर्षी जिह्यातील 81 क्रीडा संस्थानी आपल्या खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी केली आहे. आणखी कांही संस्थांना नोंदणी करावयाची असल्यास त्यांच्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा तसेच निमंत्रित स्पर्धा आयोजनासंदर्भातही अनेक निर्णय जिल्हा कबड्डी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आले. त्यानुसार स्पर्धेपूर्वी किमान दहा दिवस अगोदर मान्यता घेणे, प्रवेश अर्जानूसार खेळाडूंची वजने क्रिडांगणावरच घ्याव्यात, मर्यादित प्रवेश शुल्क, स्पर्धा वेळेवर व आटोपशीर, खेळाडू नोदणीची पडताळणी आदी बाबींचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची सभा उपाध्यक्ष प्रा.शिवाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी सहाही गटातील जिल्हा संघ निवडीबाबतचा कार्यक्रम ठरविण्यात आला. खुल्या गटातील स्पर्धा हेरले येथे तर कुमार गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी स्पर्धा शहापूर येथे आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा संघ निवडीसाठी समिंत्यांचे गठन करण्यात आले.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे-शशिकांत पवार
कोल्हापूर जिल्हा संघांनी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत नेहमीच चांगली कामगिरी केली असून ही परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन सरकार्यवाह प्रा.संभाजी पाटील व कार्याध्यक्ष डॉ.रमेश भेंडिगिरी यांनी केले. यावर्षीच्या सहाही गटातील राज्य अजिंक्यपद वस्पर्धा डिसेंबरमध्ये होणार असल्याचेही त्यानी सांगितले. क्रीडासंस्था व त्यांच्या खेळाडूंच्या ऑनलाईन नोंदणीस यावेळी चांगले सहकार्य मिळाल्याचे प्रा.आण्णासाहेब गावडे यांनी सांगितले. खेळांडूंच्या सराव शिबिराबाबत दत्तात्रय खराडे, मानसिंग पाटील आदींनी मते मांडली. सभेस उपस्थित पदाधिकारी व सदस्यांचे प्रा.चंद्रशेखर शहा यांनी आभार मानले.