दिरंगाई करणाऱ्यांवर होणार कारवाई : वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा इशारा
फोंडा : जनरेटर आणि मोठ्या इन्व्हर्टरमुळे जवळपासच्या परिसरात वीज प्रवाहात तांत्रिक बदल होऊन कामाच्या ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा घटनांमध्ये काही निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी वीज खात्याने काही ठोस पावले उचलली आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून ज्यांच्याकडे मोठे इन्व्हर्टर व जनरेटर आहेत त्यांनी रितसर परवानगी घ्यावी. दिरंगाई केल्यास कारवाई करण्याचा इशारा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे. क्रांतिमैदान-फोंडा येथील सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला काल सोमवारी भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर मंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते.
घरे किंवा आस्थापनात पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यान्वीत केलेले जनरेटर व इन्व्हर्टरमुळे वीज प्रवाहात धोकादायक तांत्रिक बदल घडून येतात. त्याचा वाईट परिणाम आसपासच्या वीज प्रवाहावर होऊ शकतो. यावेळी वीज खात्याचे कर्मचारी जवळपास दुरुस्तीकाम करीत असल्यास या ‘रिव्हर्स’ वीज प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून त्यांच्या जीवावर बेतू शकते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जेईआरसी म्हणजेच जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
वीज मीटरच्या जागेत नोव्हेंबरपर्यंत बदल करा
घरातील वीज मीटर अडगळीच्या ठिकाणी असू नयेत. त्यांच्या जागा बदलण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी केले. वीज मीटर सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्याचे नियम असून त्याचीही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांनी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मीटरच्या जागेत बदल करावेत. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून त्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले
गैरमार्गाने वीज वापरणाऱ्यांवर कारवाई होणार
गुरांना गवत काढण्यासाठी गेलेल्या रिवण सांगे येथील दोघा भावांचा विजेच्या धक्क्यामुळे झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली जाईल. वीज खात्याला अंधारात ठेऊन गैरमार्गाने वीज वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.









