पुणे / प्रतिनिधी :
Register your vote for the National Education Plan! ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी) ‘राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा’ निर्मितीसाठी सर्वेक्षणाद्वारे देशभरातील नागरिकांच्या सूचना आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
इयत्ता पहिलीपासून शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्या भाषा शिकवायला पाहिजेत, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवावेत, शिक्षण भविष्यवेधी होण्यासाठी काय करायला हवे, अशा प्रश्नांवर तुम्हीही तुमचे मत मांडू शकता आणि त्याद्वारे ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ विकसित करण्यासाठी तुमच्या सूचना देऊ शकता. या सर्वेक्षणात विशेषत: शालेय शिक्षणात कोणते बदल करणे अपेक्षित आहेत, यावर दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याला बहुपर्यायी दिली उत्तरे असून, त्या प्रत्येकाला पाच पर्याय दिले आहेत.
अधिक वाचा : MPSC च्या पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
शालेय शिक्षणातून मुलांनी कोणती मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे?, शालेय शिक्षणाकडून समाजाच्या कोणत्या अपेक्षा आहेत?, इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी विद्यार्थ्यांनी कोणती विषयनिहाय क्षेत्र अभ्यासणे आवश्यक आहेत?, देशातील शिक्षकांचा सन्मान वाढविण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका काय असावी?, असे प्रश्न ‘एनसीईआरटी’ने शालेय शिक्षणातील अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी डिजिटल सर्वेक्षणात विचारले आहेत. या सर्वेक्षणातून देशभरातील नागरिकांकडून सूचना आणि अभिप्राय गोळा करण्यात येत आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाला चालना, आरोग्य व योगासने, कला व संस्कृती, पर्यावरण जागरूकता, संवादकौशल्य, सामाजिक बांधिलकी यावर भर देण्यात आला आहे.
तुम्हीही असे सहभागी व्हा! या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे तुम्हालाही तुमचे अभिप्राय कळवायचे असतील, तर `https://ncfsurvey.ncert.gov.in/’ या संकेतस्थळाला भेट द्या.