संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे उद्गार जीवनसाधनेतून साहित्य साधना निर्माण करा
29 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
प्रतिनिधी/ काणकोण
प्रादेशिक भाषा हे सुसंस्कारित संस्कृतीचे प्रभावी माध्यम असून स्वभाषा आल्याशिवाय परभाषेतील मर्म समजणे कठीण आहे. नव्या पिढीने हे मर्म ओळखून वागायला हवे. वाङ्मयीन प्रवृत्तीचे भान ठेवून काम करायला हवे. सर्जनशीलतेचा निरंतर झरा वाहत असताना त्याला पालवी कशी फुटेल याकडे लक्ष द्यायला हवे. स्फूर्ती आणि प्रेरणा या प्रतिभाशाली शक्ती असून जीवनसाधनेतून साहित्य साधना निर्माण करतानाच आत्मशोध, कठोर परिश्रम आणि आंतरिक शक्तीच्या बळावर संस्कृतीचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी आपल्या भाषणातून केले.
काणकोणातील आमोणे येथील आदर्श ग्राम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 29 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. कोमरपंत बोलत होते. आमोणे येथील स. शं. देसाई साहित्य नगरीतील डॉ. वि. बा. प्रभुदेसाई व्यासपीठावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक समई प्रज्वलित करून आणि ज्येष्ठ साहित्यिक स्व. स. शं. देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली नवांगुळ, स्वागताध्यक्ष सभापती रमेश तवडकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, अनिल रायकर, कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो, कार्यवाह किसन फडते, कार्याध्यक्ष सुनील पैंगणकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे आनंदू देसाई, लोलयेच्या निशा च्यारी, श्रीस्थळच्या सेजल गावकर, आगोंदच्या प्रीतल फर्नांडिस, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, चित्रा क्षीरसागर, सुहास बेळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचीन आणि अर्वाचिन मराठी साहित्याचा गोषवारा घेतल्यानंतर मुक्तीपूर्व काळ आणि आताच्या परिस्थितीवर अभ्यासपूर्ण असे विवेचन त्यांनी केले. गतकाळाची परंपरा आणि नवता यांचा समेळ साधताना पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि उपभोगवादामुळे कला आणि संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. भौतिकवादाच्या पगड्यामुळे आत्मप्रौढीपणा वाढायला लागला आहे. पर्यटनामुळे कृषी संस्कृतीची पाळेमुळेच नष्ट व्हायला लागली आहेत. सर्वत्र अनाचार. माजला आहे. समुद्रकिनाऱ्यांवर प्रदूषण वाढायला लागले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे गतकाळातील विषमता, अंधश्रद्धा, दारिद्र्या यांचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे नव्या पिढीने साहित्याचे मर्म ओळखून सध्या जी मानवी नात्याची ससेहोलपट होत आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे डॉ. कोमरपंत पुढे म्हणाले.
काणकोण महालाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नेत्रदीपक अशी कामगिरी साहित्यनिर्मितीत केली आहे. परकीय सत्तेच्या जोखडातून मायभूमीला मुक्त करण्यासाठी येथील शिक्षकांनी राष्ट्रप्रेमाचे धडे दिले. मराठीचा आत्मस्वर मावळायला दिला नाही, असे सांगून सर्जनशीलतेचा झरा चिरंतन ताजा ठेवून त्याला पालवी फुटण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे डॉ. कोमरपंत यांनी स्मरण केले. येथील लोकवेद, लोकसंस्कृती, लोकवाद्यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या साहित्याचा त्यांनी उहापोह केला. संमेलन भरविणे हे सुखासुखी होत नाही. अनेक आव्हानांवर मात करून ती भरवली जातात, असे ते पुढे म्हणाले.
काणकोणची संस्कृती हीच खरी गोव्याची संस्कृती : तवडकर
गोवा मुक्तीनंतरच्या 62 वर्षांनी काणकोण तालुक्यात भरविण्यात आलेले हे साहित्य संमेलन ही एक पर्वणी असून काणकोणची संस्कृती हीच खरी गोव्याची संस्कृती आहे. गोव्यात पर्यटन क्षेत्राने विद्रुपीकरण केले आहे. पर्यटकांना उत्तर गोवा, तेथील किनारे, चर्च संस्कृती एवढेच ठाऊक आहे. म्हणून साहित्याच्या माध्यमातून समाजाची जडणघडण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत सभापती रमेश तवडकर यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने बोलताना मांडले. रमेश वंसकर यांनी स्वागत, तर सुनील पैंगणकर यांनी प्रास्ताविक केले. चित्रा क्षीrरसागर, सुहास बेळेकर, आलोख मोडक, धनश्री रायकर, हेमंत खांडेपारकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. या साहित्य संमेलनाला माजी कायदामंत्री रमाकांत खलप, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, गणेश भाकरे आणि गोव्याच्या विविध भागांतून आलेले अन्य ज्येष्ठ साहित्यिक हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती हजारे यांनी केले. राजमोहन शेट्यो यांनी आभार मानले.
श्री बलराम शिक्षणसंस्था, राजभाषा संचालनालय आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे आयोजित या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात अगदी थाटात झाली. आमोणे येथील संस्कृती भवन ते आदर्श ग्राम परिसर पूर्णपणे मराठीमय झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभारेले भव्य कटआऊट्स, 60 पेक्षा अधिक कलाकारांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग आणि साहित्य दिंडी यामुळे एक वेगळेच वातावरण तयार केले. स्वागताध्यक्ष सभापती रमेश तवडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, कार्याध्यक्ष सुनील पैंगणकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो, कार्यवाह किसन फडते आणि शिक्षक, विद्यार्थी व अन्य शेकडो मराठीप्रेमी या साहित्य दिंडीत सहभागी झाले. दिंडीच्या गजरात आदर्श ग्रामातील मुख्य शामियान्यात पोहोचल्यानंतर डॉ. पुष्पा अय्या, चंदा देसाई आणि अन्य मराठीप्रेमी महिलांनी पारंपरिक पद्धतीने या साहित्य दिंडीचे औक्षण केले. चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीतानंतर उद्घाटन सोहळा झाला.
न्यूनगंड बाजूला ठेवून कार्यासाठी पुढे सरसायला हवे : सोनाली नवांगुळ
रुसण्या फुगण्याने मानवाचे आयुष्य बरबाद होत असते. इच्छा असेल, तर मार्ग सापडत असतो. त्यासाठी न्यूनगंड बाजूला ठेवून कार्य करायला पुढे यायला हवे, असे मत अपंगत्वावर मात केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक सोनाली नवांगुळ यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मांडले. वयाच्या नवव्या वर्षी एका बैलगाडीखाली चिरडून दोन्ही पाय गमावून बसलेल्या सोनाली नवांगुळ यांनी आपल्या भाषणातून अनेक जीवन प्रसंग कथन केले. मृत्यू येईपर्यंत जगणे हा मंत्र आपण जपला असल्याचे त्यांनी सांगितले.
समोरच्या माणसाला नीट समजून घेण्यासह सगळ्या संकटांतून पुढे जाण्याची तयारी ठेवायला हवी, असे मत नवांगुळ यांनी मांडले. परिस्थितीचा बागुलबुवा करत कोणीच बसू नये. एकमेकांचा हात धरून पुढे जायला हवे. आपण केवळ राग शमविण्यासाठी काम केले, असे सांगून त्यांनी साहित्य रचना करताना किती कष्ट घेतले ते स्पष्ट केले. या साहित्य संमेलनात ग्रामीण खाद्यपदार्थ, वनौषधींची जी दालने थाटण्यात आली आहेत त्याचे नवांगुळ यांनी कौतुक केले. साहित्य उत्सवाला सधन करणारी ही गोष्ट असल्याचे मत त्यांनी मांडले.









