पूरपरिस्थितीची पाहणी : अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : नूतन प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांनी निपाणी तालुक्यातील हुन्नरगीला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांशीही त्यांनी चर्चा केली. संततधार पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा केला. प्रादेशिक आयुक्तांनी हुन्नरगीला भेट देऊन निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेतलेल्या नागरिकांचे आरोग्य व जेवणखाण याची काळजी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
संभाव्य पूर लक्षात घेऊन युद्धपातळीवर काम करा
प्रादेशिक आयुक्तांनी कोण्णूर-मांगूर रस्त्यांचीही पाहणी केली. पावसामुळे झालेल्या पीकहानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई मिळविण्यासाठी शिफारस करण्याची सूचना महसूल व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. संभाव्य पूर लक्षात घेऊन सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यात यावी, अशी सूचना प्रादेशिक आयुक्तांनी केली आहे निपाणीच्या तहसीलदारांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.









