पुणे / प्रतिनिधी :
जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. ‘भारत’ या नावाला विशेष महत्त्व असून, हे नाव आपल्या प्राचीन संस्कृतीला अनुसरून आहे. आपला देश हा ‘भारत’ असल्याची संघाची आधीपासून धारणा असून, या नावाबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले.
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीविषयी संघाचे सहसरकार्यवाह डॉ मनमोहन वैद्य आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन नावांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात विचारले असता डॉ. वैद्य यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
वैद्य म्हणाले, जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे. ते नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते. या नावासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही राहिलो आहोत. कारण आपला देश हा ‘भारत’ असल्याचीच आमची सुरुवातीपासून धारणा आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, मंकर संक्रांतीनंतरच्या चांगल्या तीथीवरील मुहूर्तावर प्रति÷ापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनुसूचित जातींना आरक्षण असावे, अशी संघाची भूमिका आहे. इतर समाजास आरक्षण देण्याचा विषय राजकीय आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली नाही. मणिपूरमधील हिंसाचार कुकी आणि मैतई अशा दोन समुदायांशी निगडित आहे. तिथे संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. वैद्य यांनी नमूद केले.
‘सनातन’ शब्दाचा अर्थ माहीत हवा
कोणताही शब्दप्रयोग करताना, त्या शब्दाचा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ माहिती नसलेले ‘सनातन धर्म’ नष्ट करण्याची भाषा करीत आहेत. भारताची ओळख ही अनादी काळापासून आध्यात्मिक अशी आहे. त्यामुळे अनेक राजवटी आल्या, तरी आपण टिकून राहिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संघात महिलांचे प्रमाण वाढविणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या राष्ट्रीय बैठकीत संघाशी संलग्न 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात 30 महिलांचाही समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुढील काळात महिलांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, आर्थिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे संमलेन आयोजित केले जात आहे. आजपर्यंत झालेल्या साठहून अधिक संमेलनात एक लाखाहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. पुढील काळात आणखी 411 संमेलने आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघाची विचारसरणी समजावून सांगणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनिक, साप्ताहिक मासिक भरणाऱ्या शाखांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत वाढ झाल्याचे सांगत त्याबाबतची आकडेवारी त्यांनी सादर केली. पुढील काळात संघाच्या कार्यात नव्याने सहभागी होणाऱ्यांना संघाची विचारसरणी समजावून सांगितली जाणार आहे. समविचारी असणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याबरोबर इश्युबेस चर्चा करून मार्ग काढले जाणार असल्याचेही डॉ. वैद्य यांनी सांगितले.








