पंतप्रधान मोदी यांनी संवाद टाळला : जर्मन वृत्तपत्र
वृत्तसंस्था / बर्लिन
गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला नसल्याचे प्रतिपादन एका जर्मन वृत्तपत्राने केले आहे. ‘फ्रँकफर्टर ऑलगेमेनिया’ असे या वृत्तपत्राचे नाव आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेवर किती संतापले आहेत, हे स्पष्ट होते. तसेच ते किती सावध आहेत, हे देखील दिसून येत आहे, असे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. या वृत्ताने खळबळ उडविली आहे.
ट्रंप यांनी भारतावर 50 टक्क्यांचे व्यापारी शुल्क लागू केले आहे. मात्र, हा निर्णय घेण्याच्या काळात त्यांनी चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्यात आला होता आणि बोलण्यासाठी वेळ मागितला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क टाळला. यातून विविध अर्थ काढण्यात येत आहेत, असे प्रतिपादन या वृत्तपत्राच्या वृत्तात केले गेले आहे.
वृत्तपत्राच्या संपादकाचे प्रतिपादन
थोरस्टेन बेनर हे या वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांनी या संबंधीचा संदेश प्रसारित केला आहे. ट्रंप यांनी भारताची अर्थव्यवस्था ‘मृत’ आहे असे विधान काही आठड्यांपूर्वी केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत नाराज झाले आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाअ असून अशा अर्थव्यवस्थेला अध्यक्ष ट्रंप यांनी मृत ठरवावे, याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दु:ख झाले आहे. त्यामुळे ते संवाद टाळत आहेत, असे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे.
अध्यक्ष ट्रंप यांची वृत्ती
जे देश अमेरिकेवर अवलंबून आहेत, त्यांना व्यापार शुल्काच्या ओझ्याखाली आणायचे अशी ट्रंप यांची वृत्ती आहे. अनेक देशांनी त्यांच्या अटी मान्य करुन अमेरिकेशी व्यापार करार केले आहेत. ट्रंप यांच्या 2016 ते 2020 या प्रथम अध्यक्षपद काळातही त्यांनी तो प्रयत्न केला होता. तथापि, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतापुरता तो प्रयत्न रोखला होता, असेही वृत्त देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा सावधपणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे नेते तो लाम यांचा अनुभव लक्षात घेतला आहे. लाम यांच्याशी ट्रंप यांचे दूरध्वनीवरुन बोलणे झाले होते. त्यानंतर ट्रंप यांनी त्वरित अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात करार झाल्याची घोषणा करुन टाकली होती. मात्र, तेव्हा या दोन देशांमध्ये करारही झाला नव्हता. तरीही ट्रंप यांनी घोषण करुन लाम यांची कोंडी केली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जाळ्यात सापडण्याचे टाळले आहे. म्हणून ते ट्रंप यांचा दूरध्वनी स्वीकारण्यास नकार देत आहेत, असाही अर्थ या वृत्तपत्राने लावला आहे.
भारत-चीन संबंधांवरही भाष्य
या वृत्तपत्राने भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले आहे. चीनला भारताची जेव्हढी आवश्यकता आहे, त्याहून अधिक आवश्यकता भारताला चीनची आहे. त्यामुळे भारत चीनच्या विरोधात अमेरिकेला साहाय्य करणार नाही. अमेरिकेचा प्रयत्न चीनला रोखण्याचा आहे. त्यासाठी ‘क्वाड’ ही चार देशांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. भारत हा या संघटनेचा सदस्य देश आहे. तथापि, चीनशी दोन हात करण्याची वेळ आलीच तर भारत चीनला दुखावून अमेरिकेच्या समवेत येणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेली ‘क्वाड’ ही संघटना तिची उद्दिष्ट्यो साध्य करण्यात अपयशी ठरली आहे. ही संघटना कोलमडत आहे, असेही या वृत्तपत्राने स्पष्ट प्रतिपादन केले आहे. तथापि, या वृत्तपत्राची प्रतिपादने खरी आहेत काय, यावर अनेक तज्ञांना शंका आहे.









