ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ईडीच्या भीतीने आमच्यातले लोक भाजपात गेले, हे शरद पवार यांनी सांगितलेलं बरोबर आहे. त्यांनी माझंही नाव घेतलं. माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता. पण मी समझोता केला नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर ईडीची धाड पडली आणि कारवाई करण्यात आली. ही वस्तूस्थिती आहे, असे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी सांगितले.
देशमुख यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते ईडी आणि सीबीआयच्या भीतीने भाजपासोबत गेले, हे काल शरद पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी माझेही नाव घेतले. पवारांनी खरी माहिती दिली. माझ्यावरही समझोता करण्यासाठी भाजप नेत्यांचा दबाव होता. पण त्यांना मी नकार दिला. त्यामुळे परमवीर सिंह याला खोटे आरोप करायला लावले. मी नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर ईडीची धाड पडली.
आता आमच्यातील काही लोक विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत गेल्याचे सांगतात. पण त्याला फारसा अर्थ नाही. त्यामधील काही जणांची ईडीची चौकशी सुरू होती. त्यांना तपासाला सामोरं जायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला.








