युवा समितीची भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-खानापूर-पणजी या नवीन राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक हे कन्नड व इंग्रजी भाषांमध्ये आहेत. त्यामध्ये मराठीला स्थान दिले नसल्याचे निदर्शनास येताच 17 फेब्रुवारी 2023 रोजी युवा समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी फलक लावण्याची मागणी केली होती. परंतु, महामार्ग प्राधिकरणाने मराठी फलक लावण्यास नकार दिल्याने युवा समितीकडून भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
बहुसंख्य मराठी भाषिक असताना मराठीला वगळण्याचा प्रकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चालविला होता. याविरोधात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच दिल्ली व बेंगळूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यासंदर्भात पत्रे लिहिण्यात आली होती. परंतु, धारवाड येथील कार्यालयाने नियमावलीचा दाखला देत इंग्रजी व स्थानिक भाषा कन्नड या दोनच भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे युवा समितीला दिली आहे.
बेळगावमधील मराठी भाषिक हे कर्नाटकात भाषिक अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद कर्नाटक राज्य भाषा कायदा 1981 मध्ये करण्यात आली आहे. तसेच 2014 साली कर्नाटक उच्च न्यायालयात माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात निकाल देताना बेळगावच्या मराठी लोकप्रतिनिधींना व मराठी भाषिकांना मराठीत सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, महामार्ग प्राधिकरणाने मराठीत फलक लावण्यास नकार दिल्याने भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे युवा समितीने तक्रार केली आहे.









