मनपाच्या तुघलकी कारभाराबाबत संताप : कन्नड भाषेत दस्तावेज भाषांतर करून आणण्याची सक्ती
बेळगाव : ई आस्थी प्रणाली अंतर्गत मिळकतीची नोंद करून घेण्यासाठी गेलेल्या मिळकतधारकांना कागदपत्रांमधील त्रूटी सांगून माघारी धाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यातच आता जुन्या मिळकतीचे मराठी भाषेतील दस्तावेज ग्राह्या धरण्यास अधिकारी नकार देत असून सदर खरेदी दस्तावेज कन्नड भाषेत भाषांतर करून घेऊन या, असे सांगून मिळकतधारकांना माघारी धाडत आहेत. त्यामुळे मनपाच्या तुघलकी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या शहर व उपनगरातील मिळकतींची ई आस्थी प्रणाली अंतर्गत नोंदणी करून घेऊन संबंधितांना ए व बी खात्याचे वितरण केले जात आहे.
उपनोंदणी कार्यालयात मिळकतींची नोंद करण्यासह बुडाकडून ले आऊट व एनए झालेल्या जागेत घरे बांधलेल्यांना ए खात्याचे वितरण केले जात आहेत. तर एनए व लेआऊट नसलेल्या पण उपनोंदणी कार्यालयात नोंद असलेल्या मिळकतींना बी खात्याचे वितरण केले जात आहे. या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे. मात्र एजंटराज फोफावण्यासह भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप केला जात आहे. अशोकनगर, कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयांमध्ये ए व बी खात्यांसाठी आलेले अर्ज स्वीकारून त्यांना खात्याचे वितरण केले जात होते. मात्र विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याने स्वत: मनपा आयुक्त शुभा बी. यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
थेट मिळकतधारक किंवा नगरसेवकांच्या मार्फत फाईल गेल्यास त्याला वेगवेगळी कारणे सांगून खाता काढून देण्यास विलंब केला जात आहे. मात्र एखाद्या एजंटाकरवी फाईल गेल्यास त्याला तातडीने मंजुरी मिळत आहे. एकंदरीत या ना त्या कारणावरून नागरिकांना सतावले जात आहे. बेळगावात यापूर्वी सर्व प्रकारचे व्यवहार मराठी भाषेतून केले जात होते. जुन्या मिळकतीचे दस्ताऐवजदेखील मराठी भाषेतच आहेत. तसे मराठी दस्तावेज घेऊन महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये गेल्यास मराठी भाषेतील दस्तावेज स्वीकारण्यास अधिकारी नकार देत आहेत. कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालयामध्ये असा प्रकार घडला आहे. मराठी भाषेतील दस्तावेज आम्हाला समजत नाही. त्यामुळे कन्नडमध्ये भाषांतर करून घेऊन या, असे सांगून माघारी धाडण्यात आले. याबाबत तेथील अधिकाऱ्यांना मिळकतधारकांनी जाब विचारला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याबाबत आम्हाला सूचना केली असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र या प्रकारामुळे मिळकतधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसा कोणताही आदेश नाही
जुन्या मिळकतींचे दस्तावेज मराठी भाषेत असल्यास ते स्वीकारून संबंधितांची ई आस्थी नोंदणी केली जात आहे. मराठी भाषेतील दस्तावेज स्वीकारू नये, असा कोणत्याही प्रकारचा आदेश बजावण्यात आलेला नाही.
– अनिल बोरगावी, झोनल आयुक्त









