कुकी समुदायाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका : कायदा-सुव्यवस्थेशी निगडित विषय : 3 जुलैला पुढील सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान आरक्षणावरून हिंसा सुरू आहे. या हिंसेच्या पार्श्वभूमीवर कुकी समुदायाला सैन्य सुरक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर जलद सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यातील हिंसा हा कायदा-सुव्यवस्थेशी निगडित विषय आहे. कुकी समुदायाला सैन्य सुरक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आम्ही 3 जुलै रोजी सुनावणी करू असे न्यायाधीश सूर्यकांत आणि एम.एम. सुंदरेश यांच्या सुटीकालीन खंडपीठाने मंगळवारी म्हटले आहे. ही याचिका मणिपूर ट्रायबल फोरम या एनजीओने दाखल केली आहे.
सुरक्षा यंत्रणा स्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. राज्यात 49 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंसेमुळे 50 हजारांहून अधिक लोक निवारागृहांमध्ये राहत आहेत.
हिंसा रोखा, अन्यथा परिणाम भोगा
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सोमवारी मदतशिबिरांना भेट दिली आहे. हिंसा रोखा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तयार रहा, शस्त्र हाती घेतलेल्या मैतेई लोकांना कुणावरही हल्ला न करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. काही मदतशिबिरांचा दौरा केला आहे. आणखी काही लोक पीडित असल्याने राज्य सरकार त्यांच्यासाठी प्री-फॅब्रिकेटेड घरांची निर्मिती करणार आहे. सुमारे 3 हजार ते 4 हजार घरांची निर्मिती केली जाईल असे बिरेन सिंह म्हणाले.
जमिनी बळकाविण्याचे सत्र
मणिपूरमधील हिंसेमुळे सुमारे 50 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अनेक गावं तर आता निर्जन ठरली आहेत. सुमारे 20 हून अधिक गावांमध्ये दुसऱ्या गटाने कब्जा केला आहे. मैतेई समुदायाचा दबदबा असलेल्या ठिकाणी त्या समुदायाच्या लोकांनी कुकी गावांवर कब्जा केला. तर कुकी समुदायाचा दबदबा असलेल्या ठिकाणी मैतेई गावांवर कब्जा करण्यात आला आहे. कब्जा कायम ठेवण्यासाठी दोन्ही गट सुमारे 200 हून अधिक बंकर्सद्वारे नजर ठेवत आहेत.
चूराचांदपूर-विष्णुपुरात सर्वाधिक हिंसा
विष्णुपूरच्या ग्वंताबी, चेयरेल मंग्जिंग, फोउगक्चाओ इखाई अवांग लेकाईचा पश्चिम भाग आणि लेईगांगमध्ये अनेक ठिकाणी मैतेई लोकांचे बंकर्स आहेत. चूराचांदपूर जिल्ह्यातील कंग्वाई, मोल्होई, सोंग्दो, मोंग्या, चवुंग्फाई आणि फोल्जांगमध्ये कुकी लोकांचे बंकर्स आहेत. रविवारी रात्री कुकी लोकांनी विष्णुपूरच्या नपत अन् तंग्जेंग गावावर कब्जा केला. सरकारने फेब्रुवारीमध्ये चूराचांदपूर आणि नोनेच्या आदिवासीबहुल गावांच्या जमिनींना संरक्षित वनाच्या श्रेणीत समाविष्ट केले होते. यावरूनही तेथे हिंसा झाली होती. मणिपूरच्या लोकसंख्येत 55 टक्के हिस्सदारी मैतेई तर 35 टक्के हिस्सेदारी कुकी-नागा समुदायाची आहे. परंतु राज्यातील 10 टक्के जमिनीची मालकी मैतेई समुदायाकडे आहे. तर 90 टक्के जमिनींवर नागा-कुकी समुदायाचे नियंत्रण आहे. राज्य सरकार कायद्यात बदल करून जमिनींना संरक्षित वनक्षेत्र घोषित करत असल्याने कुकी अन् नागा समुदायामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.









