पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानात करावे लागणारे बदल व उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन आदींचा विचार करून एमपीएससीने परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन सुधारणा 2023 पासून लागू केल्या जाणार असल्याचेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
गट-अ व गट-ब भरती-राज्य सेवा परीक्षेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. संवर्गानुसार पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार आहे. या पूर्व परीक्षेत राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा या परीक्षांचा समावेश असेल. या परीक्षांची स्वतंत्र अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेत दिलेल्या संवर्गाकरिता (पदासाठी) उमेदवाराला पसंती देण्याचा पर्याय निवडता येणार आहे. मुख्य परीक्षेच्या निकालानंतर ऑप्टींग आउट ( भरती परीक्षेतून बाहेर पडण्याचा पर्याय) नंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
गट ब व गट क भरती-सर्व अराजपत्रित गट ब व गट- क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना उमेदवाराला आवडीचे पद निवडता येणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. गट-ब आणि गट- क च्या अभ्यासक्रमानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. गट ब व क मुख्य परीक्षेसाठी पेपर 1-मराठी व इंग्रजी तसेच पेपर 2- सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, असे दोन पेपर द्यावे लागणार आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी