समाजामध्ये सहसा चोराला मानाचे स्थान नसते. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा गौळणीच्या घरातील लोणी चोरतात, यमुनेमध्ये जलविहार करणाऱ्या गोपिकांची वस्त्रs चोरतात तेव्हा त्यांचे या अशा अनेक चोरी करणाऱ्या कृत्यांचे चिंतन हरिभक्त करतात. नवव्या शतकातील थोर वैष्णव संत बिल्वमंगल ठाकूर यांनी ‘श्री चौराष्टकम’ नावाच्या सुंदर काव्यरचनेमध्ये श्रीकृष्ण कसे ‘चौराग्यअग्रणी’ म्हणजे सर्व चोरांमध्ये सर्वश्रेष्ठ चोर आहेत याचे सुंदर वर्णन केले आहे. वैष्णव सांप्रदायामध्ये हे अष्टक प्रसिद्ध असून याचे विशेषत: पुरुषोत्तम (अधिक) मासामध्ये चिंतन मनन केले जाते.
या सुप्रसिद्ध अष्टकामध्ये बिल्वमंगल ठाकूर लिहितात, व्रजे प्रसिद्धं नवनीतचौरं, गोपाङ्गनानां च दुकूलचौरम्। अनेकजन्मार्जितपापचौरं, चौराग्रगण्यं पुऊषं नमामि ।।1।। व्रजधामातील (वृन्दावनातील) प्रसिद्ध लोणी चोरणारे, गोपींची वस्त्रs चोरणारे, आपल्या आश्रितांचे अनेक जन्मांतील पाप चोरणारे-चौराग्रगण्य (सर्व चोरांमध्ये सर्वश्रेष्ठ चोर) अशा पुरुषाला मी प्रणाम करतो. श्री राधिकाया हृदयस्य चौरं, नवाम्बुदश्यामल कान्तिचौरम्। पदाश्रितानां समस्तचौरं, चौराग्रगण्यं पुऊषं नमामि ।।2।। श्रीमती राधिकेचे हृदय चोरणारे, नूतन जलधारातील श्यामकांती चोरणारे आणि निजचरणाश्रीतांचे सर्व पाप-ताप चोरणारे-चौराग्रगण्य पुरुषाला मी प्रणाम करतो. अकिञ्चनीकृत्य पदाश्रितं य: करोति भिक्षुं पथि गेहहीनम् । केनाप्यहो भीषणचौर ईदृग्, दृष्ट:श्रुतो वा न जगत्रयेपि ।।3।। जे आपल्या चरणाश्रीतांना अकिंचन करून पथावर भटकणारे भिक्षुक बनवितात. असा भयंकर चोर तिन्ही लोकांत ऐकावयास किंवा पहावयास मिळाला नाही. यदीय नामापि हरत्यशेषं,
गिरिप्रसारानपि पापराशीन् । आश्चर्यरूपो ननु चौर ईदृग्, दृष्ट: श्रुतो वा न मया कदापि ।।4।। ज्यांच्या नामांचे केवळ उच्चारण केल्याने पर्वतासमान विशाल पापसमूह नष्ट होतात, असा आश्चर्यकारी रूपवान चोर तर मी कधी पाहिला नाही किंवा ऐकला नाही. धनं च मानं च तथेन्द्रियाणि, प्राणांश् च हृत्वा मम सर्वमेव । पलायसे कुत्र धृतेद्य चौर, त्वं भक्तिदाम्नासि मया निऊद्ध: ।।5।। हे चोरा! माझे धन, मान, इंद्रिय, प्राण आदी सर्वस्व हरण करून कोठे पळून जातो आहेस? आज तर तुम्ही भक्तिरूप दोर धारण करून माझ्याद्वारा बांधले गेले आहात. छिनत्सि घोरं यमपाशबन्धं, भिनत्सि भीमं भवपाशबन्धम्। छिनत्सि सर्वस्य समस्तबन्धं, नैवात्मनो भक्तकृतं तु बन्धम्।।6।। यमराजांच्या भयानक पाशबंधाला तुम्हीच तोडता. संसाराचे भयंकर पाशबंध तुम्हीच विदीर्ण करता आणि सर्वांच्या समस्त बंधनाला तुम्हीच तोडता, परंतु आपल्या प्रेमीभक्तांद्वारे रचलेल्या प्रेममय बंधनाला मात्र तुम्ही तोडू शकत नाही. मन्मानसे तामसराशिघोरे, कारागृहे दु:खमये निबद्ध: । लभस्व हे चौर! हरे! चिराय, स्वचौर्यदोषोचितमेव दण्डम्।।7।। हे माझे सर्वस्व चोरणारे चोररूप हरे! आज मी तुम्हाला माझ्या अज्ञानरूप, भयंकर आणि दु:खमय मनरूपी कारागृहात बंदिस्त केले आहे. अशाप्रकारे आपल्या चोरीरूप दोषांच्या उचित दंडालाच अधिक वेळेपर्यंत प्राप्त करीत रहा कारागृहे वस सदा हृदये मदीये, मद्भक्तिपाशदृढबन्धननिश्चल: सन् ।
त्वां कृष्ण हे! प्रलयकोटिशतान्तरेपि , सर्वस्वचौर! हृदयान्न हि मोचयामि ।।8।।
हे माझे सर्वस्व चोरणारे कृष्ण! माझ्या भक्तिरूप पाशांच्या दृढबंधनाप्रती निश्चिंत होऊन माझ्या हृदयरूप कारागृहात सदैव निवास करा, कारण मी तर हृदयरूप माझ्या कारागृहातून कोट्यावधी कल्पांतदेखील मुक्त होणार नाही.
भगवान श्रीकृष्णांच्या अशा सामाजिकदृष्ट्या अनैतिक वाटणाऱ्या लीला सामान्य माणसाला पूर्णपणे गोंधळून टाकतात. कारण अशा सर्व दिव्य लीला आपल्या आयुष्यातील सामान्य घटनेप्रमाणे भौतिक समजतात. त्यासाठी हे समजले पाहिजे की या दिव्य लीला आपण जेव्हा पूर्णपणे शारीरिक भावनेतून पूर्णपणे मुक्त होऊन काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर या सहा विकारांपासून शुद्ध होऊ तेव्हाच समजू लागतील. तोपर्यंत आपण ज्यांचे हृदय शुद्ध आहे ज्यांनी श्रीकृष्णांच्या दिव्य लीला समजून घेतल्या आहेत त्याच्याकडून समजून घेतल्या पाहिजेत. जर श्रीकृष्णांच्या दिव्य लीला अनैतिक असत्या तर शुकदेव गोस्वामी, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य, चैतन्य महाप्रभु इत्यादी संन्याशांनी श्रीकृष्णांची भक्ती केली नसती आणि प्रचारही केला नसता. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांसारखे गृहस्थ हरिभक्तांनीही श्रीकृष्णभक्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानले आणि तसा सामान्य लोकांनाही आपल्या अभंगातून श्रीकृष्णभक्तीचा प्रचार केला.
संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे वर्णन करताना म्हणतात,
सात पाच गौळणी आलिया मिळोनि यशोदे गाऱ्हाणे देती कैसे। काय व्यालीस पोर चोरटे सिरजोर जनावेगळेचि कैसे। दही दूध तूप लोणी शिंकां नुरेचि कांही कवाड जैसेचि तैसे । चाळवुनी नाशिलीं कन्याकुमरे आमुच्या सुनांसी लाविलें पिसे गे बाइये ।।1।। अझुनी तरी यासी सांगे बरव्या परी। नाही तरी नाही उरी जीवेसाठी । मिळोनि सकळ जणी करूं वाखा । सेखीं तुज मज होईल तुटी गे बाईये ।।2।। नेणे आपपर लौकिक वेव्हार । भलते ठायी भलतें करी । पाळतुनी घरी आम्ही नसतां। तेथे आपण संचार करी । सोगया चुंबन देतो आळींगन । लोळे आमुच्या सेजाबाजावरी। शिंकी कडाडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाईये ।।3।। आतां यांची चाड नाहों आम्हां भीड । सांपडतां कोड पुरवूं मनींचे । सोसिलें बहू दिस। नव्हतां केला निस। म्हणूनि एकुलते तुमचे । चरण खांबी बांधेन जीवे। सरिसा जव न चले कांही याचे । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा । भलते हो जीवाचे गे बाईये ।।4।। घेऊनि जननी हाती चक्रपाणी । देतसें गौळणी वेळोंवेळां । निष्ठुर वाद झणी बोलाल सकळा। क्षोभ जाईल माझ्या बाळा । जेथे लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाईये ।।5।।
अर्थात ‘गोकुळातील पांचसात गौळणी मिळून कृष्णाने केलेल्या खोड्यांबद्दल यशोदेजवळ गाऱ्हाणी सांगण्यासाठी जमा झाल्या व म्हणू लागल्या, ‘काय या चोरट्या पोरास जन्म दिलास गं! मोठे शिरजोर असून जगावेगळेच आहे हे पोर तुझे! आमचे दही, दूध, लोणी शिंक्यावर राहू देत नाही. दाराकडे पहावे तर ते जसेच्या तसे असते. आमची मुलेसुद्धा यांनी फूस लावून बिघडवली, आमच्या सुनांनाही याने वेड लावले आहे. तू अजून तरी त्याला समजावून सांग, या गोष्टी बऱ्या नाहीत. हा तुझा कृष्ण, आपले आणि परके असा लौकिक भेद ठेवत नाही. हा आमच्या घरात शिरतो आणि दह्यादुधाचे घट कडाकडा फोडून टाकतो, याला धरू पहावे तर हा हातीसुद्धा लागत नाही. हा जर आमच्या हाती लागला तर आमच्या मनास येईल ते आम्ही करू. यशोदे, आम्ही खूप दिवस याचा त्रास सहन केला, तुझे हे एकुलते एक पोर म्हणून आम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष केले, पण आता जर हातात सापडला तर त्याचे हातपाय जवळच्या खांबास बांधून टाकू, मग त्याचे काही चालणार नाही. मग यशोदामातेने हातामध्ये चक्रपाणीला धरून त्या गौळणींना दिले आणि म्हणाली तुम्ही वेळोवेळी निष्ठुर शब्दाने माझ्या कृष्णाला बोलाल तर तुमचा हा क्षोभ त्याला बाधेल, मात्र याची गुणवत्ता अशी आहे की याचा हात जिथे लागेल तिथे दूधलोण्याचाच काय तर अमृताचाही पूर येतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीला पाहून मग त्या गौळणी आपल्या देशाला आणि देहभावनेला विसरून गेल्या.
अशा या श्रीकृष्णांच्या लीला अतिशय गोड आणि मधुर आहेत. पण अशा सर्व लीला जे देहभावनेतून मुक्त आहेत अशा हरिभक्ताकडूनच श्रवण केल्या पाहिजेत मग आपणही देहभावनेतून मुक्त होऊन सत्चिदानंद अवस्था प्राप्त करून परमानंद अनुभव करू शकतो. मग पुन: पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या संसारदु:खामध्ये येण्यापासून आपलीही कायमची मुक्तता होऊ शकते.
-वृंदावनदास








