राजापूर प्रतिनिधी
राजापूरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बारसू परिसरात सुरू झालेले ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम स्थानिकांनी बंद पाडल्यानंतर रविवारी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सर्वेक्षण स्थळी भेट देत पाहणी केली. मात्र यावेळी राणे यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रकल्प विरोधकांनी राणे यांच्या गाड्या अडवून धरत रिफायनरी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विरोधकांसोबत चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेण्याची ग्वाही राणे यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.
राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात रिफायनरी पकल्प होण्याकरीता राज्य व केंद्र शासनाने हिरवा कंदिल दिल्याने बारसू, सोलगाव परिसरात ड्रोन सर्वेक्षणाचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र गोवळ व शिवणे भागात या ड्रोन सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित स्थानिकांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ड्रोन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानुसार राजवाडी परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरळीत पार पडले, मात्र गोवळ परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षणाचे काम बंद पडले होते.
त्यानंतर आता राज्यशासनात फेरबदल झाल्यानंतर शनिवारपासून पुन्हा पोलीस संरक्षणात बारसू परिसरात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी बारसू सड्यावर एकत्र येत सर्वेक्षणाला विरोध केल्याने हे काम थांबविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी माजी खासदार निलेश राणे यांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. मात्र तेथून परतत असताना प्रकल्प विरोधक महिलांनी त्यांच्या गाड्याचा ताफा अडवत रस्त्यातच ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निलेश राणेंच्या गाडीचा ताफा अडवताच तसेच ग्रामस्थांचा रोष पाहताच निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगितले. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आणि सांगाल त्या वेळी आम्ही चर्चेसाठी हजर राहू, अशी ग्वाही राणे यांनी दिल्यानंतर पकल्प विरोधक रस्त्यातून बाजूला झाले. या प्रकारानंतर तात्काळ पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले..