राजापूर / वार्ताहर :
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर बारसू परिसरात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. सोमवारी सर्वेक्षण सुरू होणाच्या शक्यतेने प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने बारसू येथील सड्यावर जमा झाले होते.
रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या बाबतीत प्रशासन ॲक्शन मोडवर असताना आता प्रकल्प विरोधकही आक्रमक झाल्याने प्रशासन आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प नाणार येथून रद्द झाल्यानंतर आता हा प्रकल्प बारसू
गोवळ परिसरात होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारसू परिसरात एमआयडीसी प्रस्तावित असून याच ठिकाणी आता रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यापूर्वी काही गावांमध्ये सर्वेक्षण झाले असून गोवळ, बारसू परिसरातील सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे मधल्या काळात सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले होते.
त्यानंतर आता पुन्हा सर्वेक्षणाचे प्रशासनाकडून काम हाती घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी राजापूर येथे प्रकल्प समर्थक व विरोधक यांची बैठक घेत सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेचच २२ एप्रिल ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीपर्यंत बारसू पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ परिसरात प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यांची परवानगी असल्याशिवाय प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तर प्रकल्प विरोधकांना नोटिसा बजावत काही प्रकल्प विरोधी नेत्यांना ताब्यातही घेतले आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होईल अशा चर्चा प्रकल्प विरोधकांमध्ये सुरू होत्या
सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी सकाळपासून बारसू येथील सड्यावर प्रकल्प विरोधक जमा होण्यास सुरूवात झाली होती. तर दुसरीकडे रत्नागिरी येथून पोलिसांचा मोठा फौजफाटा राजापूरच्या दिशेने निघाला होता. दुपारपर्यंत गोवळ शिवणे, धोपेश्वर परिसरातील प्रकल्प विरोधक मोठ्या करण्यात आली. प्रशासनाने कितीही धाकदपटशाही केली तरी प्रकल्प विरोधक मागे हटणार नाही, असा निर्धार प्रकल्प विरोधकांनी केला आहे. घर-दार बंद करून जीवनावश्यक साहित्यासह ग्रामस्थ सड्यावर दाखल झाले असून सर्वेक्षणाचे काम बंद पडेपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून बसण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी बारसू येथील सड्यावर प्रकल्प विरोधक जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ सड्यावर ठिय्या मांडून होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बारसू गोवळ येथील सर्वेक्षणाच्या कामादरम्यान 1. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता प्रकल्प विरोधी आंदोलकांचे नेते सत्यजित चव्हाण व मंगेश चव्हाण यांच्यावर १५१ (३) माव प्रतिबंधत्माक कारवाई म्हणून पोलिसांनी अटक केली असून या दोघांनाही रविवारी सायंकाळी उशीरा राजापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना २५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.








