कुडाळ येथे सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता
वार्ताहर/ कुडाळ
सायबर सुरक्षा जनजागृती हे अभियान जवळपास जिल्ह्यातील 220 शाळांमध्ये राबविण्याचे आमचे टार्गेट होते. परंतु कमी कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस व एमकेसीएल टीमने ही योजना 258 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये पोहचवून सायबर क्राईम बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर सुरक्षा जनजागृती अभियान या योजनेमागचा उद्देश 50 हजार विद्यार्थ्यांमार्फत 50 हजार घरांपर्यंत पोहचवायचा आमचा प्रयत्न होता. या उपक्रमात आम्हाला यश आले आहे. सायबर गुन्हे कमी होणे ही काळाची गरज आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शुक्रवारी कुडाळ येथे सांगितले.यापुढेही सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाकडून असे उपक्रम राबवून आपला जिल्हा, तालुका, गाव सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केले जातील. असेही त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग पोलीस व एमकेसीएल आणि स्थानिक गुन्हे शाखा च्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग पोलीस सायबर सुरक्षा जनजागृती अभियान सांगता कार्यक्रम आज कुडाळ येथील मराठा समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क. म. शि. प्र. संस्था कुडाळचे अध्यक्ष आनंद वैद्य, तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, रॉटरी क्लब कुडाळचे प्रतिनिधी राजन बोभाटे, लॉयन्स क्लब सिंधुदुर्गचे प्रतिनिधी अजित भणगे, सावंतवाडी डिआय एसपी संध्या गावडे, मकेसीएल जिल्हा प्रतिनिधी प्रणय तेली, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील उभादांडा वेंगुर्ले शिक्षक वैभव खानोलकर आदी विविध तालुक्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व शिक्षक विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .