गतवर्षीच्या तुलनेत किंचित घट
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचा साठा गतवर्षीच्या तुलनेत खालावला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीसमस्या उद्भवू नये, यासाठी एलअॅण्डटीकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राकसकोप जलाशयातील पाण्याचा उपसा कमी करण्यात आला असून हिडकल जलाशयातून पाण्याचा उपसा वाढविण्यात आला आहे. राकसकोप आणि हिडकल या दोन जलाशयांतून बेळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा उष्णतेत मोठी वाढ झाली असल्याने दररोज राकसकोप जलाशयातून एक ते दीड फूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी एलअॅण्डटीकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यापूर्वी राकसकोप जलाशयातून दररोज 52 एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. मार्च महिन्याच्या 18 तारखेपासून हा उपसा करण्यात आला आहे. सध्या 40 एमएलडी पाण्याचा दररोज उपसा केला जात आहे. पाणी उपसा कमी केला असला तरीदेखील गतवर्षीच्या तुलनेत जलाशयातील पाणीसाठा घटला आहे. गतवर्षी 10 एप्रिल 2024 रोजी 2460.65 फूट पाणीसाठा जलाशयात होता. यंदा 2460.09 इतका पाणीसाठा जलाशयात आहे. सध्याचा पाणीसाठा उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याचा अंदाज एलअॅण्डटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेषकरून हिडकल जलाशयातून पाण्याचा अधिक उपसा करण्यावर भर देण्यात आला आहे.









