आरोग्य निरीक्षकांची अध्यक्षांकडे तक्रार
बेळगाव : पहाटेच्यावेळी महापालिका आयुक्त वॉर्डांमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर दुपारी कार्यालयात बैठक आहे, असे सांगण्यात येते. मात्र गेल्यानंतर बैठक रद्द झाली, असे सांगितले जात आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयात थांबवून घेतले जात आहे. त्यामुळे आम्हाला विश्रांतीच नाही, अशी तक्रार आरोग्य निरीक्षकांनी आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे केली. गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला अधिक काम देण्यात येत आहे. त्यामुळे आमच्यावर ताण पडत असून समस्या निर्माण होत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून नियमानुसार 8 तास आमच्याकडून काम करून घ्या, असेही यावेळी त्यांनी सांगितले. दिवसभर वॉर्डांमध्ये फिरायचे, त्यानंतर सायंकाळी पुन्हा कार्यालयात थांबायचे हे योग्य नाही. बैठक असेल तरच आम्हाला कार्यालयाकडे बोलवा. अन्यथा आम्ही प्रभागात असलेली कामे करू शकतो, अशा अनेक तक्रारी आरोग्य निरीक्षकांनी यावेळी मांडल्या. आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या. त्यावेळी आरोग्य निरीक्षकांनीही आपणाला होत असलेला त्रास त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर महापालिका आयुक्तांना याबाबत माहिती दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
अधिक तणावाने महसूल अधिकाऱ्याला भोवळ
गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी, महसूल कर्मचाऱ्यांना अधिक ताण दिला जात आहे. या कामाच्या तणावामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. बुधवारी उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या समोर माहिती देत असताना अचानक महसूल अधिकाऱ्याला भोवळ आली. त्यामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. या घटनेनंतर त्या अधिकाऱ्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. याबाबतही या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली.









