वृत्तसंस्था/ लंडन
मॅरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) कसोटी क्रिकेटच्या रक्षणासाठी आणि महिला क्रिकेटसाठी अतिरिक्त निधी द्यावा आणि 2027 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय सामन्यांत लक्षणीय घट करावी, अशा सूचना केल्या आहेत. लॉर्ड्सवर नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘एमसीसी’च्या 13 सदस्यीय जागतिक क्रिकेट समितीने प्रत्येक विश्वचषक स्पर्धेच्या आधीच्या एक वर्षाच्या व्यतिरिक्त द्विपक्षीय एकदिवसीय लढती बंद कराव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे. जगभरातील ‘टी20’ फ्रँचायझी लीगचा समावेश असलेले व्यस्त कॅलेंडर लक्षात घेऊन समितीने ही सूचना केली आहे.
समितीने आता विश्वचषकाच्या बाहेर खेळल्या जाणाऱ्या पुऊष संघांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे आणि 2027 ची विश्वचषक स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्याची शिफारस केली आहे, असे ‘एमसीसी’ने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. द्विपक्षीय एकदिवसीय सामने हटविल्यानंतर निर्माण होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या कमतरतेमुळे गुणवत्ता वाढेल तसेच जागतिक क्रिकेट कॅलेंडरमध्ये देखील खूप आवश्यक जागा तयार होईल, असे समितीने म्हटले आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
समितीने अनेक राष्ट्रांमध्ये कसोटी सामन्यांचे आयोजन करणे परवडत नसल्याबद्दल सतत ऐकले आहे. स्पष्ट चित्र मिळण्याच्या दृष्टीने ‘आयसीसी’ने कसोटी सामन्याचे आर्थिक लेखापरीक्षण करावे. व्यावसायिक परतावा आणि आयोजन खर्चाचे हे ऑडिट ‘आयसीसी’ला कसोटी सामना कार्यक्रम टिकवून ठेवण्यासाठी समर्थनाची गरज असलेल्या राष्ट्रांना ओळखण्याकामी मदत करेल. या गरजा नंतर कसोटी क्रिकेटचे रक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या वेगळ्या ‘टेस्ट फंडा’द्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात, असे समितीने म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर महिलांच्या क्रिकेटला बळकटी देण्यासाठी ‘आयसीसी’ सदस्य असलेल्या मंडळांनी निधी द्यावा, असेही त्यांनी सूचविले आहे.









