पुन्हा विणकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव ; वीज दरवाढीमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. अवास्तवपणे वाढविण्यात आलेली ही वीज दर तातडीने रद्द करा या मागणीसाठी विणकर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. उत्तर कर्नाटकातील व्यावसायिक विणकर संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हे निवेदन सादर करण्यात आले. वाढविलेल्या वीज दरामुळे विणकर व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. यातच कच्च्या मालाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे व्यवसाय अडचणीत आला होता. त्यातच पुन्हा सरकारने वीज दर वाढविली. त्यामुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने वाढविलेली वीज दर कमी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
साड्या विक्रीचा व्यवसायही कमी झाला आहे. या व्यवसायावर अनेक जण अवलंबून आहेत. माग चालविणारे कामगारही अडचणीत येत आहेत. महागाई आणि मंदी यामुळे आम्ही सारेच अडचणीत आलो असून याचा सारासार विचार करून वीज दरवाढ तातडीने मागे घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. वास्तविक, या व्यवसायाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. असे असताना या व्यवसायावरील जाचक अट्यांमुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. या व्यवसायासाठी विशेष योजना राबविल्या जातात. मात्र त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तातडीने वीजदर कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला आहे. हेस्कॉमलाही निवेदन देण्यात आले. गजानन गुंजेरी, नागराज हुगार, पांडुरंग कामकर, आनंद पुजारी, व्यंकटेश वनहळ्ळी, व्यंकटेश सोनटक्की, नारायण कुलगोंड, विनायक कामकर, महेश कामकर, इराप्पा तिगडी व इतर विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









