पर्यटक देतायत या कोकणी मेव्याला पसंती
संतोष सावंत, सावंतवाडी
कोकणी मेव्याची चव काही औरच असते . पण ,हा कोकणी मेवा फक्त काही ऋतू- हंगामातच पाहायला मिळतो. कोकणातील सिंधुदुर्ग ,रत्नागिरी या दोन जिल्ह्यात उन्हाळी हंगामात एप्रिल- मे महिन्यात करवंदे, जांभूळ ,आंबा, कोकम, फणस अशा चवदार फळांचा कोकणी मेवा जगप्रसिद्ध आहे . पण या मेव्यातील करवंद हे जंगली फळ फक्त मे महिन्यातच उगवते. नवल म्हणजे वर्षातून एकदाच उन्हाळी हंगामात उगवणारे हे फळ जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली- गेळे भागातील जंगलात पावसाळ्यातही आता मे ते सप्टेंबर चतुर्थी पर्यंत उगवत आहेत. सध्या वर्षा पर्यटन आंबोली मध्ये करवंदे या फळाला जोरदार मागणी आहे. कावळेसात पॉईंटवर करवंदे वीस ते तीस रुपये दराने विक्री होतात . पावसाळी ऋतूत आंबट चवदार अशी गोल मोठ्या आकाराची हिरवीगार करवंदाची फळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आंबोली पठार भागातच अशी पावसाळी हंगामात तब्बल तीन ते चार महिने करवंदाचे पीक उगवणारा हा एकमेव भाग संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील पहिलाच पठार असावा. हिरवीगार काटेरी झाडे जंगल पठार भागात आहेत. औषधी गुणधर्म असलेली ही रेडे करवंदे चवीला आंबट अशी आहेत. ती आकाराने मोठी असल्या कारणाने त्यांना रेडे करवंदे असे म्हणतात .एप्रिल मे महिन्यात ही करवंदे पिकल्यानंतर कोकणी मेवा म्हणून मुंबई बाजारपेठेत आपले लक्ष वेधून घेतात .पण , आता कोकणातील आंबोलीच्या पर्यटन स्थळी पावसाळी ऋतूत रेडे करवंदे उगवत आहेत. हे नवलच ! जंगल भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी ऋतूत उगवणारी ही रेडे करवंदे या भागातील ग्रामस्थ फक्त आपल्या खाण्यासाठीच उपयोगात आणत होते. पण, वर्षा पर्यटनाची वाढती व्याप्ती आणि गेली दोन-चार वर्ष आंबोली पर्यटनाला होणाऱ्या लाखो पर्यटकांच्या गर्दी मुळे आंबोलीतील रेडे करवंदे पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग स्थानिक गोरगरीब जनतेने सुरू केला आहे. थंड गार हवामान आणि दाट धुके , पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे असं नयनरम्य दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आणि मनमोहक असे असते . असा हा आंबोलीचा पठार पावसाळी ऋतूत एखाद्या नववधूने शाल पांघरावी असा सुंदर दिसतो . अशा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सहज चाखण्यासाठी रेडे करवंदे उपयुक्त ठरत आहेत.









