नंदन मक्कळधाम, आश्रय फौंडेशनला उपकरण वाटप
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय रेडक्रॉस संस्थेच्या बेळगाव शाखेच्यावतीने रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी डोनंट यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. नंदन मक्कळधाम व आश्रय फौंडेशन येथील एड्सबाधित मुलांसमवेत हा दिन साजरा करण्यात आला. पुढील एक महिना पुरेल इतके धान्य व प्रत्येक मुलाला सुरक्षितता उपकरण देण्यात आले.
यावेळी बोलताना डी. एन. मिसाळे म्हणाले, येथील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय रेडक्रॉस संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील. तसेच सर्वसामान्य व्यक्तींनाही या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे त्यांनी सांगितले. दिलेल्या वस्तू नंदन मक्कळधामच्या कस्तुरी व आश्रय फौंडेशनच्या नागरत्ना यांनी स्वीकारत रेडक्रॉसचे आभार मानले.
स्थापनादिनाचे औचित्य साधून पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 हून अधिक मुलींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सीमा देसाई यांनी केले. कस्तुरी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस. बी. कुलकर्णी, डॉ. सुमंत हिरेमठ, प्रा. ए. पी. मानगे, डी. एम. वाडेकर, सतीश पाटील, स्मिता पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.









