प्रतिकिलो 200 ते 300 रुपयेप्रमाणे विक्री : मिरची उत्पादन वाढीमुळे गतवर्षीच्या तुलनेत दरात घसरण
बेळगाव : बाजारपेठेत सर्वच वस्तुंचे दर वाढत असल्याने हैराण झालेल्या गृहिणींना लाल मिरचीने यंदा काहीसा दिलासा दिला आहे. गतवर्षी लाल मिरची प्रतिकिलो 400 ते 600 रुपयांपर्यंत गेली होती. यंदा मात्र सध्या अडीचशे रुपयांपर्यंत दर आहे. त्यामुळे तिखट आणि मसाला तयार करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मकर संक्रांतीनंतर उन्हाळ्याची चाहुल लागते आणि उष्म्यातही हळूहळू वाढ होते. त्यामुळे वर्षभराचे तिखट करण्यासाठी महिलांची धडपड सुरू होते. मागीलवर्षी लाल मिरचीचा दर प्रतिकिलो 400 ते 600 रुपये झाला होता. त्यामुळे लाल मिरची खरेदी करणे सर्वसामान्यांना अडचणीचे ठरले होते. त्या तुलनेत यंदा मिरचीचा दर 250 रुपयांपर्यंत आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर आवाक्यात असल्याने खरेदी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. सध्या बाजारात बॅडगी 200 ते 280 रुपये प्रतिकिलो, गुंटूर 250, संकेश्वरी 200, लवंगी 280, कोल्हापुरी 280 रुपये असा लाल मिरचीचा दर आहे. यंदा मिरची उत्पादनात वाढ झाल्याने आवकही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात मिरची खरेदीसाठी महिलांचीही लगबग पहावयास मिळत आहे.
दरामध्ये चढ-उतार शक्य
मागील महिन्याभरापासून लाल मिरचीचा दर प्रतिकिलो अडीचशे रुपयांवर स्थिर आहे. मात्र येत्या काळात दरामध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत लाल मिरचीचा दर आवाक्यात असल्याने सर्वसामान्यांकडून खरेदी होऊ लागली आहे. गृहिणी कुटुंबाला वर्षभर पुरेल इतक्या तिखटाची एकाचवेळी तरतूद करतात. त्यामुळे लाल मिरचीला मागणी वाढली आहे. बाजारात गृहिणींची खरेदीसाठी लगबग पहावयास मिळत आहे. बाजारात बाहेरून लाल मिरची येवू लागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारासह इतर ठिकाणीही लाल मिरचीची विक्री होत आहे. 200 पासून 300 रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या मिरची उपलब्ध होत आहेत.









