वृत्तसंस्था/ ऑस्टिन, अमेरिका
येथे झालेल्या अमेरिका ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावले. गेल्या चार शर्यतीतील त्याचे हे तिसरे जेतेपद आहे. मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने दुसरे स्थान मिळवित त्याचाच सहकारी ऑस्कर पियास्ट्रीची चॅम्पियनशिपमधील आघाडी कमी केली. फेरारीच्या लेक्लर्कने तिसरे स्थान मिळविले.
पियास्ट्रीला या शर्यतीत पाचवे स्थान मिळाले. त्याने 31 ऑगस्ट रोजी डच ग्रां प्रि शर्यत जिंकली होती. त्यानंतर त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली असल्याने त्याचे आघाडीचे गुण कमी होत चालले आहेत. नोरिसने आता पियास्ट्रीचे गुणांचे अंतर 14 वर आणले असून या मोसमातील पाच ग्रां प्रि व दोन स्प्रिंट रेसेस अद्याप बाकी आहेत. चॅम्पियनशिप रेसमध्ये व्हर्स्टापेन तिसऱ्या स्थानावर असून पियास्ट्रीपेक्षा 40 तर नोरिसपेक्षा 26 गुणांनी तो मागे आहे. पियास्ट्री व नोरिस कारकिर्दीतील पहिली ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत तर व्हर्स्टापेन सलग पाचव्यांदा चॅम्पियनशिप मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शनिवारी त्याने स्प्रिंट रेसही जिंकली तर मॅक्लारेनच्या दोन्ही ड्रायव्हर्सची टक्कर होऊन ते बाहेर पडल्याचा त्याला फायदा झाला.
व्हर्स्टापेनचे हे कारकिर्दीतील 68 वे तर ऑस्टिनमधील गेल्या पाच शर्यतीतील चौथे जेतेपद आहे. फेरारीला या मोसमात एकही शर्यत जिंकता आलेली नाही. पण येथे त्यांनी तिसरे व चौथे स्थान मिळविले. त्यांचा लेविस हॅमिल्टन चौथा आला. मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने सहावे, रेड बुलच्या त्सुनोदाने सातवे, किक सॉबरच्या हुल्केनबर्गने आठवे, हासच्या बियरमनने नववे व अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने दहावे स्थान मिळवित एक गुण मिळविला. आता मेक्सिको सिटीत पुढील शर्यत होणार आहे.









