वृत्तसंस्था/ ले कॅसलेट, फ्रान्स
येथे झालेल्या प्रेंच ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावले. या शर्यतीच्या 18 व्या लॅपवेळी फेरारीच्या चार्लस लेक्लर्कची गाडी क्रॅश झाल्याने त्याला बाहेर पडावे लागले.
मर्सिडीजचे ड्रायव्हर्स लेविस हॅमिल्टनने दुसरे आणि जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले. लेक्लर्कने या शर्यतीत वर्चस्व मिळविले होते. पोल पोझिशनवरून तो सर्वांच्या पुढेच होता. पण रेस जिंकण्याच्या मोहापायी 18 व्या लॅपमध्ये 11 व्या वळणावर त्याने गाडीवरील नियंत्रण गमविले आणि त्याची कार क्रॅश झाल्याने त्याला शर्यतीतून बाहेर व्हावे लागले. या घटनेनंतर व्हर्स्टापेनने आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत कायम राखत त्याने जेतेपद पटकावले. चॅम्पियनशिप रेसमध्ये त्याने आता लेक्लर्कवर 63 गुणांची आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनची ही 300 वी शर्यत होती. रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने चौथे, फेरारीच्या कार्लोस सेन्झने पाचवे स्थान मिळविले.









