अतिमुसळधार पावसाची शक्यता : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सज्जता
पणजी : राज्यात गत दोन आठवड्यांपासून जोरदार बरसणारा पाऊस आज गुऊवारी रौद्ररूप धारण करण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असून राज्यात ’रेड अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीच्या या इशाऱ्यामुळे शिक्षण खात्याने बुधवारी सायंकाळी आदेश जारी करून आज गुऊवारी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात पुढील चार दिवस (9 जुलैपर्यंत) मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यातूनच आजच्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळे लोकांनी सावध राहावे, असे कळविण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्थांना सुट्टी
अतिवृष्टीच्या या इशाऱ्यामुळे शिक्षण खात्याने आज गुऊवार दि. 6 रोजी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यात पहिली पासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सर्व संस्थांचा समावेश असेल, असे म्हटले आहे. मात्र ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा सुरू आहेत त्या ठरल्याप्रमाणे होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
गुजरात ते केरळच्या किनाऱ्यापर्यंत समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळसदृष्य स्थितीमुळे ताशी 50 किमी पेक्षा अधिक वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पणजीत दिवसभरात तीन इंच
दरम्यान, काल बुधवारीही पहाटेपासूनच राज्यभरात दिवसभर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. 24 तासात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पणजीत 24 तासांत चार इंच पाऊस पडला तर बुधवारी सकाळी 8. 30 ते सायंकाळी 5. 30 वा. पर्यंत तीन इंच पाऊस पडला.
जनजीवन पूर्णत: विस्कळीत
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सकल भागात सर्वत्र पाणी साचले आहे. काही नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढली असून शहरी भागात रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यातून अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात वाहने कलंडणे तसेच गटारात अडकून पडण्याचे कित्येक प्रकार घडले. राज्यात अनेक भागात झाडे कोसळल्यामुळे वाहने तसेच घरे आणि अन्य मालमत्तेची नुकसानी झाली. परिणामी जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले.
शक्यतो कोणी घराबाहेर पडू नये…
हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ट आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. संपूर्ण राज्यभरात हा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगावी, शक्यतो घराबाहेर पडू नये, मुलांना घराबाहेर खेळण्यास पाठवू नये, कोणत्याही उंच वृक्षाच्या खाली उभे राहू नये, घरातील सर्व वीज उपकरणे बंद ठेवावी तसेच घराबाहेरही कोणताही वीज खांब किंवा अन्य उपकरणास स्पर्श करणे टाळावे, असे प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.









