पुणे / प्रतिनिधी :
‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराला गुरुवारी सायंकाळी धडकले असून, या वादळाचा पाकिस्तान तसेच राजस्थानलाही मोठा फटका बसणार आहे. राजस्थानला शुक्रवारी तसेच शनिवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. याबराबरोबरच या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तरेकडील राज्यातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘बिपोरजॉय’ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकले. वादळाने मोठया प्रमाणात सौराष्ट्र व कच्छच्या परिसरात हानी केली आहे. शुक्रवारी पहाटेपर्यंत याचा परिणाम जाणवणार असून, त्यानंतर मात्र याचे न्यून दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. तसेच हे क्षेत्र पाकिस्तानमार्गे पुन्हा राजस्थानात परतणार आहे. याच्या प्रभावामुळे राजस्थानात शुकवारी तसेच शनिवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे काही भागात अतिवृष्टी व सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे. उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी उशिरा याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.









