प्रतिनिधी/ पुणे
महाराष्ट्र किनारपट्टी, गोवा आणि संपूर्ण कर्नाटकात मंगळवारी आणि बुधवारी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ बुधवारी हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार असून, गुरुवारी त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. याच्या प्रभावामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा मारा होणार आहे. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, कर्नाटक राज्यात मंगळवार तसेच बुधवारी अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, तामिळनाडू आदी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 25 मेपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा मारा सुरूच राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
देशभर पाऊस
मध्य महाराष्ट्र, बंगालचा उपसागर, आसाम येथे हवेची द्रोणीय स्थिती असल्याने पूर्व किनारपट्टी, पूर्वोत्तर भारत, सिक्किम, बिहार, छत्तीसगढ या राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. राजस्थान तसेच ओरिसाच्या काही भागात पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.
राज्याला पावसाने झोडपले
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक भागाला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात आर्द्रतायुक्त वारे राज्यात येत असल्याने दुपारनंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी तसेच रात्री पावसाचा मारा अधिक होता.
पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, रायगड, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, बीड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर आदी जिह्यात पावसाने हजेरी लावली. कमी वेळेत जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साठले. शेतीत पाणी भरल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार आहे.
मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह कोकणला झोडपणार
मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिह्यात बुधवार 21 मे ते शनिवार 31 मेपर्यंतच्या दहा दिवसात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्मयता असून, मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिह्यात पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 25 मेपर्यन्त जोरदार, तर विदर्भातील 11 जिह्यात मध्यम पावसाची शक्मयता ज्येष्ठ हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे.
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अशा तीन समुद्रात 17 ते 20 डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान, तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि या तिन्ही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्मयता या आठवड्यात निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गुजरात व महाराष्ट्र किनारपपट्टी लगत, तर बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल व ओरिसा किनारपट्टी, प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील किनारपपट्टीr लगत चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती तयार होणार आहे. अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचे गुजरातकडे, तर बंगालच्या उपसागारातील वाऱ्यांचे ओरिसा-छत्तीसगडकडे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजरात, ओरिसा, बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्मयता असल्याचे खुळे यांनी म्हटले आहे.
राज्यभर पाऊस
कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 जिह्यात पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 25 मेपर्यंत जोरदार, तर विदर्भातील 11 जिह्यात या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे. विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे,जळगांव्। छ. संभाजीनगर, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड अशा अठरा जिह्यात या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असेल. महाराष्ट्रात या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचा सल्ला असून, कपाशी व टोमॅटो लागवडी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी, एखाद्या-दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कमाल-किमान तापमानात घट
वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेच्या किमान तापमानातही घट राहील. संपूर्ण मे महिना आल्हाददायक राहणार आहे.
वादळ नाही
भारत महासागरीय क्षेत्रात मे महिन्यात कुठेही चक्रीवादळाची शक्मयता नाही, असे खुळे यांनी सांगितले.









