पुणे / प्रतिनिधी :
कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत रेड अलर्टचा इशारा शुक्रवारीही कायम असून, सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे, रायगड, पालघर, राज्यात पुढचे चार दिवस धुवाधार पाऊस होणार असून, पुणे जिल्हय़ातील घाट क्षेत्रात शुक्रवारी अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
गेले दोन दिवस राज्यातील काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. त्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. पालघर, ठाणे, रायगडला पाऊस झाल्याने येथील अवस्था बिकट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रातही धुवाधार पाऊस झाल्याने दरडी कोसळल्या आहेत.
राज्यात धुवाधार पाऊस
पुढील चार दिवस राज्यात धुवाधार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे राज्यात पाऊस होणार आहे. यात शुक्रवारी काही जिल्हय़ांत रेड अलर्ट, तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील घट क्षेत्रात पुढील चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.








