पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा : मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती
पणजी : गोव्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून गेल्या 24 तासांत राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. मंगळवारी संपूर्ण गोव्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. सांखळी, वाळपई परिसराला तर यथेच्छ झोडपून काढल्याचे वृत्त आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोवा आणि कोकण प्रांतामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील नद्यांचा जलस्तर वाढला असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यातल्या त्यात सांखळी आणि वाळपई तथा सत्तरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालेली आहे. मंगळवारी दिवसभरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. वाळपई येथे सायं. 5.30 वा.पर्यंत 4 इंच पावसाची नोंद झाली. पणजीत दिवसभरात 2 इंच, जुने गोवे येथे 3 इंच पाऊस पडला. हवामान खात्याने गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता परंतु पुणेतून कोकण व गोवा प्रांतासाठी रेड अलर्ट जारी केले आहे.
सरासरी पावणेदोन इंच
गोव्यात आज सर्वत्र मुसळधार वृष्टी होणार असून सर्वत्र सावधतेचा इशारा दिला आहे. पारंपरिक मच्छीमारांना समुद्रात जाण्यावर पूर्णत: बंदी केली आहे. मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 42.5 मि.मी. म्हणजे पावणेदोन इंच पाऊस पडला. उत्तर गोव्यात 2 इंच तर दक्षिण गोव्यात दीड इंच सरांसरी पाऊस झाला. राज्यात आतापर्यंत यंदाच्या मौसमात पडलेल्या पावसाची नोंद आता 67 इंच एवढी झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस 10 टक्के जास्त आहे. उत्तर गोव्याच्या तुलनेत 8 इंच पाऊस दक्षिण गोव्यात जास्त पडलेला आहे. सांगे येथे गोव्यातील सर्वाधिक 77 इंच पावसाची नोंद झालेली आहे आणि जुलै अखेरीस सांगे इंचाचे शतक गाठणार आहे. केपे आणि मडगाव येथे प्रत्येकी 75 इंच पाऊस यंदाच्या मौसमात झालेला आहे.
अणजुणेच्या पाण्यात झपाट्याने वाढ
अणजुणे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 78.40 मीटर एवढा पाणीसाठा असून तो धरण्याच्या क्षमतेच्या प्रमाणानुसार 30 टक्के आहे. गेल्या 48 तासांत अणजुणे धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी मध्यरात्री तेथे 4 इंच पाऊस झाला तर मंगळवारी दिवसभरात 2 इंचापेक्षाही जास्त पावसाची नोंद झालेली होती.









