पुणे / प्रतिनिधी :
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने बुधवारी रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱयाला रेड अलर्टचा, तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्हय़ात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओरिसाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या 24 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. हे क्षेत्र पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. मध्य प्रदेश व लगतच्या भागावर हवेचे द्रोणीय क्षेत्र, याबरोबरच दक्षिण कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाची तीव्रता वाढली आहे.
मंगळवारीही रायगड, रत्नागिरीतील काही भागांत, तर पुणे, सातारा घाट परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारीही या भागात रेड अलर्ट आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. याबरोबरच विदर्भातील अनेक जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
धरणे फुल्ल विसर्ग सुरू
गेले दोन आठवडे सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे.
तेलंगणातही अलर्ट देशभर पाऊस
दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या 24 तासांत तेलंगणा, आंध्र तसेच ओरिसातही रेड अलर्ट देण्यात आला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने वायव्य, उत्तर, मध्य, पूर्वोत्तर, दक्षिणेकडील भागात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे.