वृत्तसंस्था/ मुंबई
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने भरती घोटाळ्यातील व्हिसलब्लोअरच्या आरोपानंतर नैतिक आचरणाचे उल्लंघन केल्याबद्दल सहा कर्मचारी आणि सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवर बंदी घातली आहे, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना, चंद्रशेखरन म्हणाले की, सॉफ्टवेअर क्षेत्रातील अलीकडील नोकरी घोटाळ्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यात येत आहे.
अशा घटनांवर कठोर कारवाई : एन चंद्रशेखरन
‘कोणत्याही आर्थिक प्रदर्शनापूर्वी, प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिक आचरण आणि सचोटी. त्यामुळे जेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून नैतिक आचरणाचा भंग होतो तेव्हा मला त्रास होतो. सर्व कंपन्या याला गांभीर्याने घेतात आणि आम्ही अशा घटना गांभिर्याने घेऊ’ असे आश्वासन एन चंद्रशेखरन यांनी दिले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये लाचखोरी घोटाळ्यात टीसीएस अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून सहा कर्मचारी आणि सहा फर्मवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, अमेरिकेच्या तक्रारीची बाहेरील तपासनीसाकडून चौकशी केली जात आहे.









