जिल्हा क्रीडांगणावर उमेदवारांची शारीरिक चाचणी : महिला-पुरुषांची 720 पदे भरली जाणार
बेळगाव : धावण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा, खांबावर चढण्यासाठीची स्पर्धा, दोरीउड्यांसाठी लागणारा वेग आणि गोळाफेकसाठी लागणारी ताकद लावून आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी जीवाचे रान करणारी तरुण पिढी असे चित्र सध्या जिल्हा क्रीडांगणावर दिसत आहे. हेस्कॉमकडून सध्या लाईनमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून बेळगावसह इतर जिल्ह्यांतील उमेदवार मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पुरुष उमेदवारांसोबत महिला उमेदवारही वीजखांबावर चढण्यामध्ये कोठेही कमी नाहीत, हे भरती प्रक्रियेतून दिसून येत आहे. तब्बल चार वर्षांनंतर हेस्कॉमकडून लाईनमन पदासाठी जम्बो भरती घेतली जात आहे.
720 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. 2 ते 4 जूनदरम्यान जिल्हा क्रीडांगणावर भरती होत असून यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दररोज अडीचशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. 100 मीटर धावणे, एका मिनिटात दोरीउड्या मारणे, गोळाफेक व वीजखांबावर चढणे अशा चाचण्या घेण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी सर्व उमेदवार व चाचण्या यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हुबळी येथील टेक्निकल डायरेक्टर जगदीश यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता प्रवीण चिकार्डे, कार्यकारी अभियंता मनोहर सुतार, विनोद करूर, साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, प्रवीणकुमार सुखसारे यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
लाईनमन पदासाठी बेळगावमध्ये सोमवारपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. केपीटीसीएलनंतर आता हेस्कॉममध्ये भरती होत आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे. हेस्कॉमला उत्तम पॉवरमन मिळावेत, यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
– प्रवीणकुमार चिकार्डे









