प्रतिनिधी/ पणजी
महापालिका प्रशासनातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सामायिक संवर्गाच्या अंमलबजावणीचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांची भरती तात्पुरती कारवाई म्हणून स्थगित ठेवली जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी केली.
महापालिकेतील स्थगित नोकरभरतीसंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री राणे बोलत होते. ते म्हणाले, महापालिका नोकरभरती संबंधीची फाईल कायदामंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे त्यांच्या माहितीसाठी पाठवली जाणार आहेत. त्यानंतर ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तसेच मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही नगरविकासमंत्री राणे म्हणाले. कॉमन कॅडर हे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, हा निर्णय घेतल्याशिवाय कोणत्याही महानगरपालिकेत भरती होणार नाही. व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी असे करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगिले.
नोकरभरती करण्यापूर्वी नोकरशाहीची चाललेली मक्तेदारी ही एक समस्या आहे. या समस्या निकालात काढणे गरजेचे आहे. कारण काही कर्मचारी वाढीव कालावधीसाठी एकाच ठिकाणी कार्यरत राहतात. शिवाय निवृत्त वेतन मिळण्यास होणारा विलंब आदी कारणे असल्याने जोपर्यंत कॉमन कॅडर लागू होत नाही, तोपर्यंत महापालिकेत नोकरभरती करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.









