विकास आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : 194 स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणार
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यातील 35 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. पात्रताधारक 194 स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकास आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांची निवड यादी जाहीर केली जाईल. एकूण 194 स्वच्छता कर्मचारी आणि 8 लोडर यांच्या नेमणुकीसाठी लवकरच निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. नेमणुकीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोणत्याही एजंटाच्या संपर्कात राहू नये, असे स्वच्छता कर्मचाऱ्यांना बैठकीत सांगण्यात आले. निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून नेमणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मानदंडानुसारच ही प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









