आशिष आडिवरेकर,कोल्हापूर
Kalmba Jail Kolhapur : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने कारागृहातील कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण येत आहे.यावर उपाय म्हणून राज्यातील विविध कारागृहांमध्ये नवीन 2 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत.कारागृह प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावास राज्याच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे.हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला आहे.यानुसार कळंबा मध्यवर्ती कारागृहासाठी तुरुंगाधिकारी वर्ग 1 चे 3, वर्ग 2 चे 3 तर 50 कर्मचाऱ्यांचे बळ मिळणार आहे.त्यामुळे कारागृहातील मोबाईल, गांजा, मारामारीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये मुंबई,पुण्यासह राज्य, देशभरातील गुंड शिक्षा भोगत आहेत.खून, मारामारी, दरोड्यासह बॉम्बस्फोट अशा गंभीर घटनांमधील कैदी येथे आहेत.कळंबा कारागृह 24 एकर जागेत आहे.तेथे 40 बॅराक तर 10 अंडा सेल आहेत.कळंबा कारागृहाची क्षमता 1800 आहे. पण यामध्ये 2100 हून अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहे.कारागृह नियमावलीनुसार 6 बंदीजनांमागे 1 शिपाई आवश्यक आहे.पण कळंबा कारागृहात 106 शिपाई आहेत. बंदोबस्तासाठी केवळ 137 अधिकारी,कर्मचारी आहेत. मंजूर 158 पदे असून यापैकी 21 पदे रिक्त आहेत.उपलब्ध कर्मचाऱ्यांना 3 शिफ्टमध्ये ड्युटीत कैद्यांची वैद्यकीय तपासणी,बंदोबस्त,नातेवाईकांच्या भेटी यांचा समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात नियोजन करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
मंजूर व रिक्त पदे
पदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
अधीक्षक 1 0 1
अधीक्षक वर्ग 1 1 0 1
वैद्यकीय अधिकारी 2 1 1
कार्यालयीन अधीक्षक 1 0 1
तुऊंगाधिकारी श्रेणी 1 5 5 0
तुऊंगाधिकारी श्रेणी 2 14 11 3
सुभेदार 6 5 1
हवालदार 22 11 11
शिपाई 106 104 2
एकूण 158 137 21
नव्याने मंजूर झालेली पदे
तुऊंगाधिकारी श्रेणी 1 : 3 पदे
तुरुंगाधिकारी श्रेणी 2 : 3 पदे
सुभेदार : 30 पदे
हवालदार : 10 पदे
शिपाई : 10 पदे
एकूण 56 पदे
सांगली, सातारा, सोलापूर येथील मोका आरोपी स्थलांतरणाची गरज
कळंबा कारागृहात कोल्हापूरसह राज्यातील कैदी आहेत.सांगली,सातारा,सोलापूर येथे मोका कोर्ट नसल्याने तेथील सुमारे 300 हून अधिक बंदी येथे ठेवले आहेत.मात्र या तिन्ही ठिकाणी मोका कोर्ट मंजूर झाले आहे.त्यामुळे येथील बंदीजन त्या त्या जिह्यातील कारागृहात नेल्यास कळंबा कारागृहावरील ताण कमी होणार आहे.
कारागृहाला मिळणार बळ
राज्यातील अनेक कारागृहांत अधिकारी,कर्मचारी संख्या कमी आहे.तुरुंगाधिकारी श्रेणी 1, 2 सह सुभेदार,हवालदार,शिपाई पदाच्या भरती प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला बळ मिळणार आहे.
स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक