कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट व्हॉईस संघाची मागणी
बेळगाव : राज्यात हजारो पत्रकार असून त्यांना वृत्तांकनासाठी गावोगावी फिरावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने पत्रकारांना मोफत बसपास द्यावा. तसेच वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या पत्रकारांना निवृत्तीवेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट व्हॉईस असोसिएशनतर्फे बुधवारी सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागातील 300 हून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गुणवत्ता असणाऱ्या पत्रकारांची नेमणूक करावी. वार्ताहरांना फिरण्यासाठी मोफत बसपास द्यावा. मागील काही दिवसात वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे वकील व डॉक्टरांप्रमाणे पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू करावा. राज्यातील 800 हून अधिक वृत्तपत्रे व मीडियातील कामगारांची कामगार आयुक्तालयाकडे नोंद करावी. प्रत्येक पत्रकाराला शासनाकडून विमा सुरक्षा द्यावी. पत्रकारांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करावी. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. समाजासाठी प्रत्येक क्षण काम करणारा पत्रकारच सध्या सेवासुविधांपासून वंचित आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे पत्रकारांचे नुकसान होत आहे. समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. त्यामुळे राज्य सरकारने पत्रकारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष बंगले मल्लिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनने आंदोलन केले आहे.









