ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करुन मृतदेह डोंगरवाडी (ता. मुळशी) येथील प्लस व्हॅलीच्या दरीत टाकण्यात आला होता. हा मृतदेह बाहेर काढण्यात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीला यश आले आहे.
रणजितसिंग मेलासिंग (वय 70, रा. वाघोली, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रणजितसिंग याचे अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याचा खून करुन मृतदेह मुळशीच्या प्लस व्हॅली परिसरातील दुर्गम दरीत टाकण्यात आला. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मदतीने मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाऊस व धुके यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर दिवसभराच्या प्रयत्नांनंतर शनिवारी सायंकाळी मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.









