बांधकाम स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : देखभालीचा भुर्दंड मनपालाच सोसावा लागतोय, नालेसफाईचा घेतला आढावा
बेळगाव : स्मार्ट सिटीकडून शहरात राबविण्यात आलेली विकासकामे आता महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. रस्ते तसेच इतर कामांच्या देखभालीसाठी महापालिकेकडे 6 कोटी रुपयांची ठेव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही सदर ठेव महापालिकेकडे ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेला स्मार्ट सिटीच्या कामांची देखभाल करावी लागत आहे. यासाठी स्मार्ट सिटीला तातडीने महापालिकेकडे 6 कोटी रुपयांची ठेव ठेवण्यासंदर्भात कळविण्यात यावे, अशी सूचना शुक्रवारी महापालिकेच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती होते. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी बैठकीपुढील विषयांचे वाचन करण्यासह मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी प्रामुख्याने अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या युजी केबलचा प्रश्न चर्चेला आला. महानगरपालिकेच्यावतीने अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत युजी केबल घालण्यात आल्या होत्या. मात्र, स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आल्याने ठिकठिकाणी युजी केबल नादुरुस्त झाली आहे. तात्पुरती दुरुस्ती करून युजी केबल सुरू करण्यात आली असली तरी सदर युजी केबल नव्याने घालण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच यासाठीचा आराखडा देखील तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, स्मार्ट सिटीकडून करण्यात आलेल्या कामांचे हस्तांतरण करून घेण्यापूर्वी सदर कामांची स्थिती पाहून अधिकाऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे होते, असे सदस्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. यावर प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देऊन पाहणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीची कामे मनपाकडे हस्तांतर करून घेण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगून आपले हात झटकले. सध्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या देखभालीसाठी मनपाचा निधी खर्च करावा लागत आहे.
स्मार्ट सिटीकडून देखभालीसाठी 6 कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण ती रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे तातडीने ठेव ठेवून घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील नालेसफाईचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बहुतांश प्रभागांमध्ये नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. पण काही सेक्शन ऑफिसर्सनी स्थानिक नगरसेवकांना याबाबतची माहिती देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिका अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सेक्शन ऑफिसर्सना भर बैठकीतच धारेवर धरले. तसेच कोणतेही काम करत असताना जीपीएस फोटो घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









