माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे आवाहन : हुबळीत एकता परिषद
बेंगळूर : एकीच्या अभावामुळे वीरशैव लिंगायत समुदायातील लोकांची संख्या कमी झाली आहे. आमच्याकडे राजकीय ताकद असेल तरच पूर्णपणे न्याय मिळू शकेल. संविधानात सहा धर्मांनाच मान्यता आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणावेळी जातीच्या कॉलममध्ये वीरशैव लिंगायत असे नोंदवावे. पोटजातींमध्ये तुमच्या आरक्षणाला संधी असेल त्यानुसार नमूद करावे, असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. हुबळी येथे शुक्रवारी वीरशैव लिंगायत एकता परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.
दिंगालेश्वर स्वामीजी धाडसी पाऊल उचलले आहे. वीरशैव लिंगायतांनी ठाम राहून एकत्र यावे, यासाठी स्वामीजींनी हे धाडस केले आहे. याकरिता वीरशैव महासभा खांद्याला खांदा लावून उभी आहे. ही बाब समाधानाची आहे, असेही बोम्माई यांनी सांगितले. आमचा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे. आजच्या पिढीला याचे महत्त्व सांगणे आवश्यक आहे. सकल जीवांचे कल्याण करणे ही वीरशैव लिंगायतांची संस्कृती आणि परंपरा आहे. आमच्यात एकी असेल तर आपल्याला स्पर्श करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. 30 टक्क्यांपर्यंत असणारी आमची लोकसंख्या 10 टक्क्यांवर आली आहे. याचे कारण आमच्यात एकी नाही. केवळ सर्वेक्षण होत आहे म्हणून एकत्र जमणे पुरेसे नाही, असे त्यांनी सांगितले.
तुमची संख्या किती, हे महत्वाचे !
कोणता समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या किती प्रगत आहे हे जाणून गरिबांनाही समान स्तरावर आणण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. राज्यात होणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणात तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही कोणत्या पोटजातीतील आहेत हेही महत्त्वाचे नाही. तुमची संख्या किती आहे हे दाखविणे महत्वाचे आहे. मागील वेळी झालेल्या चुका यावेळी दुरुस्त करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणावेळी जातीच्या कॉलममध्ये वीरशैव लिंगायत नमूद करावे. पोटजातीच्या कॉलममध्ये काय नमूद करावे, याचे स्वातंत्र्य महासभेने दिले आहे, असेही ते म्हणाले.









