निगम संकटात असतानाही विणकरांना काम : वस्त्राsद्योगमंत्री शिवानंद पाटील यांची माहिती
बेळगाव : राज्यामध्ये 9 हजार हातमाग विणकरांची नोंद असून यामध्ये 3 हजार 850 विणकर कार्यरत आहेत. त्यांना आवश्यक प्रमाणात काम दिले जात असून त्यांच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. भविष्यामध्येही त्यांना कच्च्या मालाची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती वस्त्राsद्योग, ऊस विकास आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष सदस्य पी. एच. पुजारी यांनी हातमाग विणकरांच्या समस्या सभागृहात मांडून त्यांच्या विकासाच्या योजनांची माहिती देण्याची मागणी सभागृहात केली. यावेळी मंत्री शिवानंद पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. यावर समाधान न मानता सदस्य पुजारी यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. विणकरांना काम मिळत नसल्याने मिळेल तो व्यवसाय करावा लागत आहे. त्यांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी त्यांनी केली. राज्यामध्ये केवळ हातमाग विणकर नसून इतर विणकरही आहेत. त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी व आर्थिक सबलीकरणासाठी सरकारने ठोस निर्णय घेतला पाहिजे. हातमाग विणकरांना कच्चामाल पुरविण्यात येत नसल्याने बेकार होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यावर उत्तर देताना मंत्री शिवानंद पाटील यांनी मागील सरकारच्या कार्यकाळात हातमाग कामगारांना सहावी आणि सातवी विद्यार्थ्यांचे गणवेशासाठी कापड तयार करून देण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र अनेक विणकरांनी हातमागावर कापड तयार न करता फॅक्टरीमध्ये कापड तयार करून पुरवठा केला आहे. सदर कापड निकृष्ट दर्जाचे आहे. यामुळे यावर वाद निर्माण झाला होता. यासाठी 14.38 कोटीची निविदा रोखून धरण्यात आली होती. अखेर यावर तोडगा काढून निविदेनुसार पैसे देण्यात आले आहेत. असे असले तरी हातमाग कामगारांना सरकारकडून काम देण्यात येत आहे. कच्च्यामालाची पूर्तता केली जात आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. त्यांच्या विकासासाठीही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.









