मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर या शहरात नुकताच एका अर्भकाचा जन्म झाला आहे. या अर्भकाने जन्माला येताक्षणीच एका विक्रमाची नोंद केली आहे. या पुल्लींगी अर्भकाचे जन्माच्या वेळचे वजन 5.2 किलो इतके प्रचंड आहे. पाऊंडच्या प्रमाणात हे वजन 11.44 इतके भरते. सर्वसाधारणत: गर्भात पूर्ण वाढ झाल्यानंतर जन्माला आलेल्या अर्भकांचे पुरुष अर्भकाचे वजन 2.8 ते 3.2 किलो इतके असते. तर स्त्रीअर्भकाचे वजन 2.7 ते 3.02 किलो इतके असते. पण पाच किलोहून अधिक वजन घेऊन जन्माला येणे हा प्रकार सहस्रावधींमधून एकाद्याच वेळेला घडतो, अशी माहिती या बाळाच्या मातेचे बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. या ‘पैलवान’ बाळाची सेल्फीही या डॉक्टरांनी प्रसिद्ध केली आहे.
या शहरातील 34 वर्षीय महिला शुभांगी हिला प्रसववेदना होऊ लागल्यानंतर तेथील प्रसिद्ध राणी दुर्गावती रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करुन बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर नवजात अर्भकाकडे पाहूनच डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे वजन केल्यानंतर ते 5.2 किलो इतके भरले. इतक्या वजनाचे अर्भक जन्माला येणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. या बाळाचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनाही अवर्णनीय असा आनंद झाला. साऱ्या रुग्णालयात हे वृत्त वेगाने पसरले. त्यामुळे या बाळाला पाहण्यासाठी इतर रुग्णांचे नातेवाईकही येऊ लागले आहेत. इतके धष्टपुष्ट बाळ जन्माला येणे ही घटना असामान्य मानली जाते. इतक्या अधिक वजनाचे बालक या रुग्णालयात प्रथमच जन्माला आले आहे, असे हे बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांनीही नंतर ही माहिती देताना स्पष्ट केले आहे.









